नवीन वर्षांच्या स्वागताचा आनंद व्यक्त करण्यासाठी एकीकडे हॉटेल, ढाबा, पार्टी यांच्याकडे लोकांचा मोर्चा वळला असतानाच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून अस्वच्छतेच्या कारणावरून तयार-कच्चे पदार्थ, बेकरी पदार्थ, मद्याचा साठा जप्त करून १९४ नमुने तपासणीसाठी पाठवले. या तपासणीअंती कारवाई होणार आहे.  सर्वाना सुरक्षित पदार्थ मिळावेत व कोणालाही अन्नामुळे त्रास होऊ नये, यासाठी  राज्यातील २०० अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी विविध ठिकाणी तपासणी केली. या तपासणीत हॉटेल, ढाबा, पार्टी, सामुदायिक कार्यक्रम यांच्यावर विशेष लक्ष देण्यात आले. या अधिकाऱ्यांनी तयार अन्नपदार्थाचे १०२ नमुने, रवा-मैदा-बेसन अशा कच्च्या पदार्थाचे ५५ नमुने, केक-बिस्किटे अशा पदार्थाचे ८ नमुने, गोळ्या-चॉकलेट यांचे ४ नमुने तर मद्याचे २५ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.