शाळकरी मुलींचे अपहरण करून त्यांना वाममार्गाला लावणाऱ्या टोळ्यांचा छडा लावून त्यांच्यावर ‘मोका’खाली कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले. राज्यात विशेष मोहीम राबवून हरविलेल्या मुला-मुलींचा शोध घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विधान परिषदेत यासंदर्भात शोभा फडणवीस, अलका देसाई, विद्या चव्हाण, नीलम गोऱ्हे आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यात वर्षांकाठी सरासरी आठ हजारांच्या वर मुली व महिला बेपत्ता होण्याच्या घटना घडत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा या राज्यांतील टोळ्या शाळकरी-महाविद्यालयीन मुलींचे अपहरण करून किंवा अल्पवयीन मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी विकत असल्याचे आढळून आले आहे. त्यांना स्थानिक दलालही मदत करीत असतात. पोलिसांमध्ये तक्रारी केल्या तर त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. या वाढत्या प्रकारांनी मुले व पालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्यामुळे अशा टोळ्यांवर ‘मोका’खाली कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुली व महिलांचे अपहरण करून त्यांना वाममार्गाला लावणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मोकाखाली कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर मुली बेपत्ता झाल्याची तक्रार प्राधान्याने नोंदवून घेऊन त्वरित पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात येतील. आतापर्यंत बेपत्ता झालेल्या मुलींपैकी ८५ ते ९५ टक्के मुलींचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. त्याचबरोबर आता राज्यात विशेष मोहीम राबवून हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.