News Flash

परळ स्थानकाजवळील बेकायदा झोपडय़ा जमीनदोस्त

मंगळवारी सकाळी रेल्वे प्रशासनाने परळ रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त केल्या.

एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रशासनाची कारवाई

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पुलावर घडलेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उचललेला असतानाच आता रेल्वे हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यास प्रशासनातर्फे सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी रेल्वे प्रशासनाने परळ रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा उजेडात आल्याने रेल्वे प्रशासनाने बांधकामाच्या पाडकामाला सुरुवात केली आहे.

परळ रेल्वे स्थानक पादचारी पुलाला लागूनच असलेल्या साई दर्शन संघामधील झोपडय़ांवर रेल्वे प्रशासनाने मंगळवारी कारवाई केली. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक आणि रेल्वेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे दुर्घटनेच्या चार ते पाच दिवसांनंतर रेल्वेकडून साई दर्शन संघातील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली होती. दिवाळीदरम्यान या झोपडय़ांवर कारवाई केली जाणार होती. मात्र स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपाने ही कारवाई दिवाळीनंतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ३२ अनधिकृत झोपडय़ांचे पक्के बांधकाम प्रशासनाकडून पाडण्यात आले. रहिवाशांच्या विरोधामुळे मोठा पोलीस फाटा कारवाई स्थळी उपस्थित होता. या कारवाईमुळे साई दर्शन संघातील रहिवाशी वाऱ्यावर आल्याचे चित्र या वेळी दिसले. मागील ४५ वर्षांपासून आम्ही या ठिकाणी वास्तव्यास असून रेल्वे प्रशासनाने पर्यायी राहण्याची सोय करून न दिल्याने कुठे जावे, असा प्रश्न उपस्थित झाल्याचे रहिवाशी किशन परमार यांनी या वेळी सांगितले. रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून रहिवाशांच्या पर्यायी निवासासंदर्भातील समस्येवर लवकरच तोडगा      काढला जाईल, असे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितले. साई दर्शन संघांप्रमाणेच त्यापुढे असणाऱ्या सुंदर नगर आणि आसपासच्या भागांतील अनधिकृत झोपडय़ांना येत्या १७ तारखेपर्यंतची मुदत दिली असल्याने, रेल्वे प्रशासनाच्या कारवाईचा बडगा यापुढे असाच सुरू राहणार असल्याचे दिसत आहे.

मध्य रेल्वेवरील परेल स्थानकाला लागूनच असलेल्या झोपडय़ांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. अशा प्रकारची कारवाई रेल्वेकडून यापूर्वीही करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांना लागूनच असलेल्या अतिक्रमणांमुळे स्थानकात प्रवेश करताना किंवा स्थानकातून बाहेर पडताना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या मध्य रेल्वेच्या ३७ हेक्टर, तर पश्चिम रेल्वेच्या ४१ हेक्टर जागेवर अतिक्रमण झालेले आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मस्जिद स्थानक, सॅन्डहर्स्ट रोड, परेल, करी रोड, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, तर पश्चिम रेल्वेवरील लोअर परेल, एल्फिन्स्टन, माहीम, वांद्रे, खार, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवली यासह अन्य काही स्थानकांदरम्यान मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण आहे. रेल्वेकडून पोलिसांच्या मदतीने अतिक्रमणे हटवण्याचे काम केले जाते; परंतु पुन्हा ‘जैसे थे’च परिस्थिती होते. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, गेल्या ऑक्टोबर महिन्यात एल्फिन्स्टन, माहीम, जोगेश्वरी यासह काही स्थानकांना लागूनच असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली होती. या कारवाईनंतर टप्प्याटप्प्यात आणखी काही ठिकाणी कठोर कारवाई केली जाणार आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनीही परेल स्थानकाला लागूनच असलेल्या झोपडय़ांवर कारवाई केल्याचे सांगत अशी कारवाई यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करताना रेल्वेकडून राज्य सरकारचे सहकार्य घेतले जात असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 1:02 am

Web Title: action on illegal encroachment near parel station
Next Stories
1 घोडागाडींवरील कारवाईचे ‘घोडे’ अडलेलेच!
2 ग्राहक प्रबोधन : मधुमेह तपासणीच्या खर्चालाही विमा संरक्षण
3 तपासचक्र : शेवटची फेरी
Just Now!
X