कुर्ल्याजवळ असलेल्या हलाव पुल परिसरातील करोनाबाधित महिलेचा सकाळीच मृत्यू झाल्यामुळे स्थानिक पोलिसांनी बोलाविल्यामुळे तत्परतेने धाव घेणाऱ्या पालिकेच्या सहायक वैद्यकीय अधिकाऱ्याला तातडीने दुसरीकडे धाव घेताना मात्र डोक्यावर हेल्मेट नसल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. पोलिसांची इतकी कर्तव्य तत्परता पाहून संबंधित वैद्यकीय अधिकारीही नि:शब्द झाला.

एल विभाग कार्यालयातील सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. शब्बीर मलिक हा सकाळी दहाच्या सुमारास करोनाबाधित महिलेच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यासाठी पोहोचला. त्याचवेळी त्याला शीव रुग्णालयात करोनासंदर्भातील कार्यशाळेसाठी जाण्याचे आदेश देण्यात आले. तो घाईघाईत निघाला खरा. परंतु हलाव पुलाजवळ नाकेबंदी करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी त्याला अडवले. आपण डॉक्टर आहोत आणि घाईघाईत शीव रुग्णालयात जायचे असल्यामुळे हेल्मेट घालायला विसरलो, असे त्यांनी सांगितले. परंतु तोपर्यंत त्यापैकी एका वाहतूक पोलिसाने गाडीचे छायाचित्र काढून विनाहेल्मेट असल्याबद्दल ५०० रुपये दंडही भरण्यास सांगितला. वाहतूक पोलिसांचा हा पवित्रा पाहिल्यावर आपण डॉक्टर आहोत वा करोना पथकात काम करीत आहोत, तरीही ते या पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, असे डॉ. मलिक यांना उगाचच वाटून गेले. करोना पथकात असलो म्हणजे खूप काही करतो आहोत, असे अजिबात वाटून घेण्याची गरज नाही, असेच या घटनेने मला समजल्याचे डॉ. मलिक यांनी सांगितले. माझ्याकडे हेल्मेट होते. ते मी घालण्याचीही तयारी दाखविली. पण वाहतूक पोलीस ऐकतच नव्हते, याचेच वाईट वाटले, असेही ते म्हणाले.

याबाबत वाहतूक विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या कारवाईचे समर्थन करताना सांगितले की, ज्याप्रमाणे हे डॉक्टरमहाशय  करोनाविरोधात उदात्त काम करीत आहेत, त्याचप्रमाणे आमचे पोलीसही आपली डय़ुटी निभावत होते. विनाहेल्मेट प्रवास करून जिवावर बेतले तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल या डॉक्टर महाशयांनी स्वत:लाच विचारायला हवा. उलट त्यांनी पोलिसांचे अभिनंदन करायला हवे. टाळेबंदीच्या काळात बेभान गाडय़ा चालविण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे अपघात होत आहेत. अशा वेळी दुचाकीस्वारांवर विमाहेल्मेट असणाऱ्यांविरुद्ध कारवाई महत्त्वाची आहे.