News Flash

ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर कारवाई करण्याचे आदेश

ऑनलाइन औषधविक्रीला बंदी असूनही काही संकेतस्थळांवरून औषधांची विक्री केली जात आहे.

गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीररीत्या ऑनलाइन पद्धतीने विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. यासोबतच ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या काही संकेतस्थळांवरही कारवाई करण्याच्या सूचना औषध निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन औषधविक्रीला बंदी असूनही काही संकेतस्थळांवरून औषधांची विक्री केली जात आहे. यामध्ये गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदेशीररीत्या विक्री होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २० मार्च रोजी ‘गर्भपाताच्या गोळ्यांची ऑनलाइन सर्रास विक्री’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीरपणे दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने यामध्ये दोषी आढळेल्या संकेतस्थळावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यासोबतच अन्य ऑनलाइन औषधांची विक्री करणाऱ्या संस्थांवरही कारवाई करण्याची पावले उचलली आहेत.

ऑनलाइन औषधविक्रीचे प्रकार मागील तीन-चार वर्षांपासून राज्यभरात सुरू झाले असून प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणे, बनावट डिजिटल प्रिस्क्रिप्शन बनविणे असे गैरप्रकार वाढत आहेत. यातील बहुतांश संकेतस्थळे बाहेरील राज्यातील असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे अडचणीचे होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्याला घातक..

ऑनलाइन पद्धतीने मागवली जाणारी औषधे कोठून आणली जातात याबाबत कोणतीही शाश्वती नसल्याने यामध्ये बनावट, मुदतबाह्य़, विनापरवाना उत्पादित केलेली किंवा भेसळयुक्त औषधे दिली जाऊ शकतात. तेव्हा अशा प्रकारच्या संकेतस्थळांवरील औषधांमुळे होणार थोडासा फायदा आरोग्याला घातक ठरू शकतो. तेव्हा नागरिकांनी ऑनलाइन औषध खरेदी करू नये असे आवाहनही अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 4:11 am

Web Title: action on online medicine selling websites
Next Stories
1 ‘फॅशन स्ट्रीट’वरील फेरीवाल्यांवर बडगा
2 उन्हाचा ‘ताप’ वाढला!
3 ग्राहक प्रबोधन : विमा कंपन्यांच्या चुकीचा फटका ग्राहकांना नको!
Just Now!
X