‘मुंबई टॅक्सी मेन्स युनियन’चा आंदोलनाचा इशारा; टॅक्सीचालकांना कायदा हाती घेण्याचा अधिकार काय?

आपल्या थांब्यांवर गाडय़ा उभ्या करणाऱ्या खासगी वाहनचालकांच्या गाडीतील ‘हवा गुल’ करण्याचे टॅक्सीचालकांनी ठरविले असून भविष्यात या थांब्यावर वाहनचालक विरूद्ध टॅक्सीचालक असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात आपल्या व्यवसायात आडकाठी आणणाऱ्या खासगी वाहनचालकांच्या विरोधात टॅक्सीचालकांच्या संघटनेने हे हत्यार परजले असले तरी या पद्धतीने कायदा हातात घेण्याचा टॅक्सीचालकांना काय अधिकार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

सध्या मुंबई शहरात सुमारे १६०० अधिकृत टॅक्सी थांबे आहेत. या थांब्याचा रोज २० ते २५ हजार टॅक्सी आधार घेत असतात. यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ८ ते १० लाखांच्या घरात आहे. मात्र मुंबईत वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यात अ‍ॅपबेस टॅक्सींमुळे आधीच हैराण झालेल्या टॅक्सी चालकांच्या अधिकृत थांब्यावर खासगी वाहनांची पार्किंग केली जात आहे. यात खासगी वाहन चालक आणि टॅक्सी चालक यांच्यात वादावादीचे प्रमाणही वाढत आहे. दरम्यान बेकादेशीर पर्किंगचा दंड केवळ १०० रुपये असल्याने खासगी वाहनाचे चालक टॅक्सी चालकांना न जुमानता बिनधास्त वाहनांचे पार्किंग करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी टॅक्सी मेन्स युनियनने आगळीवेगळी क्लृप्ती लढवली असल्याचे सांगितले जात आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या आठवडय़ात दक्षिण मुंबईत अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा युनियनकडून देण्यात आला आहे.

‘अनेकदा टॅक्सी थांबा सोडून इतर ठिकाणी गाडी लावल्याने टॅक्सी चालकांनाच भरुदड बसत आहे. याचधर्तीवर येत्या आठवडय़ात आम्ही टॅक्सीच्या अधिकृत थांब्यावर खासगी वाहने उभी केल्यास त्या वाहनांची हवा काढणारे आंदोलन करत आहोत,’ असे मुंबई टॅक्सी मेन्स युनिनचे अध्यक्ष ए. एल. क्वॉड्रोस यांनी सांगितले.

गाडीची हवा काढल्यास कारवाई काय?

टॅक्सी चालकांनी एखाद्या वाहनाची हवा काढल्यास, त्याची पोलीस तक्रार झाल्यास त्यांना मोठा दंड बसू शकतो. यात घटनेचे पडसाद किती मोठय़ा प्रमाणात उमटतात त्यावर अंवलबून आहे. असे एका अधिकाऱ्याने सांगितले.