दोन महिन्यांत पाच हजार जणांवर कारवाई; कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस व वांद्रे स्थानक हद्दीत सर्वाधिक तक्रारी

मुंबईतील उपनगरात मुजोर रिक्षा चालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) उघडलेल्या विशेष मोहिमेत पाच हजार रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत आरटीओकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. कुर्ला व वांद्रे स्थानक आणि लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेरील चालकांविरोधात सर्वाधिक तक्रारी व प्रकरणांची नोंद होत आहे.

वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील एका रिक्षाचालकाला जादा भाडे देण्यास विरोध करणाऱ्या प्रवाशाला चालकाकडून मारहाण करण्याची घटना घडली होती. या घटनेचे मोबाइलमधील चित्रीकरण समाजमाध्यमांवर पसरले.  मुंबई उपनगरात रिक्षाचालकाकडून भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, जादा प्रवासी, परवाने व बिल्ले सोबत न बाळगण्याचे प्रकार हे नेहमीच घडत असतात. त्यांच्यावर कारवाई करूनही पुन्हा जैसे थेच परिस्थिती होते. वांद्रे परिसरातील घटनेनंतर मात्र आरटीओने रिक्षाचालकांविरोधात कठोर कारवाई सुरू केली. गेल्या २७ फेब्रुवारीपासून रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात उघडलेल्या मोहिमेत पाच हजार २१२ प्रकरणांची नोंद झाली आहे.

उपनगरांतील वांद्रे स्थानक, कुर्ला स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस बाहेरील चालकांविरोधात सर्वाधिक प्रकरणांची नोंद होत असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले. त्यामुळे या परिसरात आरटीओने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांकडे अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते. येथे मोठय़ा प्रमाणात लूट होते. त्यामुळे या परिसरात सर्वाधिक कारवाई होत आहे. तसेच घाटकोपर, मुलुंड, भांडुप, बोरीवली स्थानक व त्या परिसरासह अन्य ठिकाणीही कारवाई करण्यात येत आहे.

बिल्ले, परवाने नसणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई

रिक्षाचालकांकडून सोबत बिल्ला व परवाना जवळ बाळगण्यात येत नाही. अशा प्रकारच्या ३ हजार १२५ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. भाडे नाकारल्याबद्दल कारवाई करण्यात आलेल्या रिक्षाचालकांची संख्या ७०५ इतकी आहे. त्याखालोखाल जादा प्रवासी वाहतूक केल्याने ३३९ चालकांविरोधात दंडात्मक व परवाना निलंबनाची कारवाई केली आहे. जादा भाडे व अन्य प्रकरणांमध्येही चालक दोषी आढळले असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले.

२,६०० चालक परवाने जप्त

२,६०० रिक्षाचालकांचे परवाने जप्त करण्याची कारवाई आरटीओने केली आहे. तर १७१ रिक्षाही जप्त करण्यात आल्या आहेत. काही चालकांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.