शिवसैनिकाने आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शिवसेना भवनात रीतसर पैसे भरून शिव वडापाव योजनेतून दहिसर येथे सुरू केलेली वडापावची गाडी ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांनी मित्रप्रेमापोटी पालिका अधिकाऱ्यांमार्फत बुधवारी बुलडोझर चालविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे दहिसर परिसरातील शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून या प्रकरणी थेट शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दाद मागण्याच्या तयारीत शिवसैनिक आहेत.

दहिसर येथे राहणारे रवी पाटील एका खासगी कंपनीत कामाला होते. कंपनी बंद पडल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा यांच्या उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत ते होते. लहानपणापासूनच त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आकर्षण होते. त्यामुळे ते आपोआपच शिवसेनेकडे आकर्षित झाले. तरुणपणापासून ते शिवसेनेचे हिरिरीने काम करीत होते. शिवसेनेच्या नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांचे कार्यकर्ते म्हणून रवी पाटील या परिसरात ओळखले जातात.

बेरोजगार झाल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या शिव वडापाव योजनेची आठवण झाली. त्यांनी तात्काळ शिवसेना भवन गाठले आणि वडापावच्या गाडीविषयी माहिती मिळविली. त्यानंतर रीतसर ६५ हजार रुपये भरून शिव वडापाव योजनेत गाडी मिळविली.

गेली आठ वर्षे दहिसर (प.) येथील रघुनाथ म्हात्रे रोडवरील सिद्धिविनायक मंदिराजवळ ते शिव वडापावची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी रवी पाटील यांच्या गाडीजवळील इमारतीमध्ये एक हॉटेल सुरू करण्यात आले आहे. या हॉटेलसमोरच शिव वडापावची गाडी येत असल्यामुळे संघर्ष सुरू झाला होता. या हॉटेलचे मालक आणि ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांमध्ये दोस्ताना आहे. त्यातूनच ही गाडी हटविण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आणि अखेर बुधवारी शिव वडापावची ही गाडी पालिकेच्या देखभाल विभागामार्फत तोडण्यात आली. विशेष म्हणजे पालिकेच्या परवाना विभागामार्फत अशी कारवाई केली जाते. परंतु देखभाल विभागातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देताच बुधवारी सकाळी ही कारवाई उरकली.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेच्या आशीर्वादाने अनधिकृतपणे शिव वडापावच्या गाडय़ा उभ्या आहेत. पालिकेमध्ये शिवसेना सत्तेवर पालिका प्रशासनाला शिव वडापावच्या गाडय़ांवर कारवाई करता आलेली नाही. मात्र ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांनी आपल्या मित्रप्रेमापोटी पालिका अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करीत ही वडापावची गाडी तोडून टाकली. यामुळे दहिसरमधील शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची तयारी शिवसैनिक करीत आहेत.