रसिका मुळ्ये

समाजमाध्यमांवरील लेखन, त्यावरून होणारी कारवाई आदी मुद्दे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असताना आता वादाचा आणखी एक अध्याय समोर आला आहे. काही सनदी लेखापाल (सीए), सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समाजमाध्यमांवरील लेखन हे अत्यंत आक्षेपार्ह असून, असा मजकूर प्रसृत करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची ताकीद ‘द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडिया’ने (आयसीएआय) दिली आहे.

शासकीय निर्णय, संस्था यांबाबत समाजमाध्यमांवर विविध स्तरांतून होणारे लेखन सध्या चर्चेत आहे. आता ‘आयसीएआय’ने देशातील सीए, सीए करणारे विद्यार्थी यांना समाजमाध्यमांवरील लेखनाबाबत सूचना दिल्या आहेत. ‘काही लेखापालांचे समाजमाध्यमांवरील लेखन हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते,’ असे संस्थेचे म्हणणे आहे. संस्थेने सीए आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत मार्गदर्शक सूचनांचा एक मसुदा नुकताच जाहीर केला. त्यामध्ये समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याबाबत तंबी देण्यात आली आहे. समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह लेखनासाठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल किंवा विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल, असे संस्थेने म्हटले आहे.

तक्रारी नकोत

संस्थेबाबतच्या तक्रारी आणि अडचणी संस्थेसमोर मांडण्यापूर्वी काही सनदी लेखापाल आणि विद्यार्थ्यांनी त्या समाजमाध्यमांवर मांडल्या आहेत. काहींनी थेट (कॉर्पोरेट) मंत्रालयाकडे तक्रारी केल्या आहेत. व्यवसायाची आणि संस्थेची प्रतिमा मलिन होईल असे लेखन, छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती, संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करू नयेत. त्याचप्रमाणे दुसऱ्याने पाठवल्यास ते पुढे पाठवू नयेत, अशीही सूचना देण्यात आली आहे.

संस्थेचे म्हणणे काय?

‘काही सनदी लेखापालांचे समाजमाध्यमांवरील लेखन हे आक्षेपार्ह असल्याचे आढळले. त्यामुळे सामाजिक सलोखा, शांतता, स्थैर्य धोक्यात येऊ शकते. राष्ट्रीय सुरक्षेलाही बाधा पोहोचू शकते. तसेच इतर देशांबरोबरील सलोख्याचे संबंधही बिघडण्याचा धोका आहे. काही लेखन हे संस्थेची आणि व्यवसायाची प्रतिमा मलिन करणारे, नागरिकांमध्ये गैरसमज पसरवणारे आहे. अशा स्वरूपाचे लेखन केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचीही नोंदणी रद्द करण्यात येईल. ‘संस्थेच्या कायद्यानुसार व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येईल,’ अशा आशयाचे पत्रक संस्थेने काढले आहे.

सनदी लेखापाल किंवा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हेतू नाही. सनदी लेखापाल म्हणून व्यक्त होताना एखाद्या विषयातील संपूर्ण माहिती घेऊनच जबाबदारीने व्यक्त व्हावे. जे विषय आपल्या अखत्यारीत येत नाहीत, त्याबाबत व्यक्त होताना भान राखले पाहिजे. त्याचप्रमाणे एखादा विषय मांडायचा असल्यास तथ्य तपासून, मुद्देसूदपणे तो मांडला जावा, हे या सूचनांमागचे हेतू आहेत. संस्थेने दिलेल्या सूचना नव्या नाहीत. अनैतिक वर्तनासाठी कारवाई करण्याची तरतूद संस्थेच्या कायद्यात आहे.

– मंगेश किनरे, माजी अध्यक्ष (पश्चिम विभाग)