टाळेबंदीमुळे मजूर स्थलांतरासाठी मालवाहतूक वाहनांमधून अवैधरीत्या आणि धोकादायकरीत्या प्रवास करत आहेत. अशा प्रकारे अवैधरीत्या जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्यातील ४६५ वाहनांवर ‘आरटीओ’ने कारवाई केली आहे. ठाणे आरटीओने सर्वाधिक २३३ वाहने पकडली आहेत. यापाठोपाठ नाशिक, अहमदनगर, धुळे, कल्याण आरटीओनेही मोठी कारवाई केली आहे.

करोनामुळे राज्यात गेल्या दीड महिन्यापासून लागलेली टाळेबंदी शिथिल होताना दिसत नसल्याने राज्यातील अन्यप्रांतीय कामगार, मजूर आपल्या कुटुंबासह स्थलांतर करत आहेत. पायपीट करतानाच मध्येच प्रवासात काही जण ट्रक, टेम्पो, कंटेनर यांसह अन्य छोटय़ा-मोठय़ा वाहनांचा आधार घेतात. एकाच वाहनातून २५ ते ५० जण जाताना दिसतात. चालकाच्या बाजूलाच पाच ते सहा जण बसतात. शिवाय वाहनाच्या टपावरही एकाच वेळी दहा ते पंधरा जण बसतात. ट्रकच्या आतही खच्चून गर्दी असते. त्यांच्यासोबत असलेली लहान मुले, स्त्रिया यांचा जीवही धोक्यात घातला जातो. ही वाहतूक करणाऱ्यांमध्ये मालवाहतूक वाहनेच आघाडीवर आहेत.

अशा वाहनांविरोधात कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व आरटीओंना दिले आहेत. त्यानुसार राज्यातील आरटीओच्या ६५ भरारी पथकांमार्फत ही कारवाई होत असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली. त्यानुसार आतापर्यंत ४६५ वाहने पकडताना चालक-मालकांवर कारवाई के ली आहे. एकटय़ा ठाणे आरटीओकडून २३३ वाहनांवर कारवाई झाल्याचे सांगितले.