News Flash

बनावट मद्याविरोधातील कारवाईला धार

बनावट ताडी बनविणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने बनावट मद्याबाबतच्या तक्रारींवरही कारवाई करण्याचे ठरविले आहे.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : बनावट ताडी बनविणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने बनावट मद्याबाबतच्या तक्रारींवरही कारवाई करण्याचे ठरविले आहे. बनावट ताडीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने पहिल्यांदाच कारवाई केली आहे. मात्र आरोग्याशी निगडीत असलेल्या कुठल्याही बनावट पेय वा वस्तूविरुद्ध कारवाई करण्याची मुभा कायद्यातच असल्यामुळे आता बनावट मद्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन आयुक्तांनी दिले आहेत.

सोलापूर येथे ताडीमध्ये क्लोरेट हायड्रेटची भेसळ केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांना अज्ञात व्यक्तीने दिली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्यासाठी पुणे विभागाला सांगितले. परंतु ही कारवाई आपल्याला करता येत नाही, असा युक्तिवाद अधिकाऱ्यांनी केला. मात्र काळे यांनी अन्न सुरक्षा आणि मानक कायदा व नियमावलीत ही कारवाई आपल्याला कशी करता येते, हे या अधिकाऱ्यांना समजावून सांगितले. त्यानुसार साताऱ्याचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले तसेच सोलापूर येथील महिला सुरक्षा निरीक्षक एन. टी. मुजावर यांच्यासह पथके तयार करून सोलापूर परिसरात पाच ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. मात्र अशा पद्धतीची कारवाई बनावट मद्याबाबतही करता येऊ शकते, हे काळे यांनी या अधिकाऱ्यांना दाखवून दिले. पेय वा मद्य हे बनावट असल्याबाबत प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे, असेही काळे यांनी स्पष्ट केले.

अनेक रेस्तराँ आणि बारमध्ये बनावट मद्याची विक्री केली जाते. हा विषय उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारित असला तरी बनावट मद्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनालाही आहेत. कायद्यात तसे म्हटले आहे. मात्र आतापर्यंत त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्याला घातक ठरणाऱ्या घन वा द्रव वस्तुची तपासणी करून कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला असल्यामुळे यापुढे बनावट मद्याविरोधातही कारवाई केली जाईल.
– अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:55 am

Web Title: action taken on duplicate liquor selling dd70
Next Stories
1 चेंबूरच्या वाशी नाक्यावरील कोंडी सुटणार?
2 दूतावासाला धमकीचे पत्र पाठवणारा तरुण अटकेत
3 पालिकेच्या मालमत्तांची भाडेवाढ लांबणीवर
Just Now!
X