अन्न व औषध प्रशासनाचा इशारा
औषध दुकानांत फार्मासिस्ट असला पाहिजे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेच्या पाश्र्वभूमीवर सायंकाळी सहानंतर औषध दुकाने बंद ठेवण्याच्या आंदोलनाची हाक दुकानदारांनी दिल्यानंतर अशारीतीने औषध दुकाने बंद ठेवून रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिला आहे.
प्रत्येक औषध दुकानात फार्मासिस्ट असलाच पाहिजे हा कायदा रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून त्याची अंमलबजावणी करणे अन्न व औषध प्रशासनाचे कर्तव्य आहे. खुद्द औषध दुकानदारांची संघटनाही आमच्यासोबतच्या बैठकीत हे मान्य करते. मग ते आंदोलन कसे करतात, असा सवालही झगडे यांनी केला.
प्रशासनाने १ जानेवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील ५४१५ औषध दुकानांची तपासणी केली. त्यात १०१३ दुकानांमध्ये फार्मासिस्ट नव्हता. त्यातील ७३९ दुकानांना तातडीने औषध विक्री बंद करण्यास सांगण्यात आले. ४० जणांचा परवाना निलंबित झाला तर ५० जणांचा परवाना रद्द झाला, अशी माहिती झगडे यांनी दिली. तसेच मधल्या काळात ७९० दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबईत ३९९ दुकानांची तपासणी झाली. १७० जणांना औषध विक्री तातडीने थांबवण्यास सांगण्यात आले आहे. तर १६६ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
योग्य औषधे योग्य प्रमाणात रुग्णांना दिली जावीत यासाठी फार्मासिस्टचे महत्त्व मोठे आहे. औषधांच्या बिलावर त्याची सही असलीच पाहिजे. राज्यात फार्मासिस्टची संख्याही पुरेशी आहे, असेही झगडे यांनी स्पष्ट केले.
औषध दुकानाचा परवाना घेताना फार्मासिस्ट दुकानात असेल व किती वेळ असेल याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल केले जाते. तसेच दुकान किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत उघडे राहील याचेही प्रतिज्ञापत्र दुकानदार देतात. त्यामुळे सायंकाळी सहानंतर दुकान बंद ठेवणाऱ्यांवर फसवणुकीसह कायद्यातील इतर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असे झगडे यांनी स्पष्ट केले.

आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध..
मुंबईत सुमारे ७५० दुकाने ही खुद्द फार्मासिस्टची आहेत. ती सुरूच राहतील. शिवाय २४ तास औषध विक्री करणारी, रुग्णालयांच्या आवारात असलेली दुकानेही सुरू राहतील. त्याचबरोबर बृहन्मुंबईत औषध दुकान बंद असल्यामुळे आकस्मिक परिस्थितीत औषध हवे असल्यास अधिकारी मदतीस असतील, असे झगडे यांनी सांगितले.या अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे-
ए. पी. जटाधर: ९८९२२९२८६९, एम. जी. केकातपुरे:९९६७८३९१९५ आर. बी. बनसारे : ९८९२७४००८२,एस. एस. काळे :९९८७२३६६५८