दूरचित्रसंवादाद्वारे तपासणीचे आदेश; निर्णय अहवालानंतर

मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले कवी-लेखक वरवरा राव यांची स्थिती नेमकी कशी आहे हे स्पष्ट होण्यासाठी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी नानावटी रुग्णालय प्रशासनाला दिले. या माध्यमातूनही राव यांच्या आरोग्याची स्थिती नीट समजत नसल्यास डॉक्टरांच्या पथकाने तळोजा कारागृहात जाऊन त्यांची तपासणी करावी आणि त्यांच्या आरोग्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आदेश दिले.

८१ वर्षांचे राव हे सध्या तळोजा कारागृहात बंदिस्त असून दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. ती अशीच राहिली आणि कारागृहातच त्यांचा मृत्यू झाला, तर तो कोठडीमृत्यू असेल, असा आरोप त्यांच्या कु टुंबियांच्या वतीने अ‍ॅड्. जयसिंग यांनी गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी के ला. तसेच त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्याची, त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यासाठी एक विशेष वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्याची आणि त्यांना तातडीचा जामीन मंजूर करण्याची मागणी राव यांच्या कु टुंबियांनी के ली आहे.

न्यायमूर्ती अनिल मेनन आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी गेल्या ऑगस्ट महिन्यापासून राव हे अंथरुणाला खिळून आहेत, असे न्यायालयाला सांगितले. कच्च्या कैद्याच्या आरोग्याची काळजी घेणे ही राज्य सरकार आणि तपास यंत्रणेची (एनआयए) जबाबदारी आहे. राव यांना ज्या प्रकारे ताब्यात घेण्यात आले, ते क्रूर, अमानवी आणि प्रतिष्ठेने जगण्याच्या त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होते, असा आरोपही जयसिंग यांनी केला.

न्यायालय म्हणते..

नानावटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रामुख्याने ज्यांनी जुलै महिन्यात राव यांच्यावर उपचार केले आहेत, त्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून राव यांची वैद्यकीय तपासणी करावी आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा..

रुग्णालयात नेण्यास विरोध..

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) राव यांना नानावटी रुग्णालयात हलवण्यास विरोध केला. कैद्यांना त्यांनी कुठे उपचार घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे राव यांना ही मुभा दिल्यास चुकीचा पायंडा पडेल. असा दावा एनआयएतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला.