बंगाली चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार तापस मॉल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट ‘अबोध’ यामध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. मुंबईतल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

तापस पॉल यांचा जन्म २९ सप्टेंबर १९५८ रोजी झाला. वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी करिअरला सुरुवात केली. ८०च्या दशकात त्यांना चित्रपटसृष्टीत चांगलंच यश मिळालं होतं. त्यांचे एकामागोमाग एक चित्रपट हिट झाले होते. ‘साहब’, ‘परबत प्रिया’, ‘भलोबासा भलोबासा’, ‘अमर बंधन’, ‘अनुरागेर चोयान’ हे त्यांचे चित्रपट हिट झाले होते. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘साहब’ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

तापस पॉल यांनी काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. माधुरी दीक्षित आणि तापस यांनी ‘अबोध’ चित्रपटातूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. २०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि ते जिंकले होते.