अश्विनी एकबोटे यांच्या निधनाने ‘तोच खेळ पुन्हा एकदा’

प्रत्यक्ष रणांगणावर लढताना ‘वीरमरण’ येणे हे सैनिकासाठी जसे गौरवाचे असते तसेच रंगमंचावर काम करत असतानाच मृत्यू येणे हे कलाकारांसाठी भाग्याचे समजले जाते. रंगदेवता आणि प्रेक्षकांच्या साक्षीने तोंडाला रंग लावलेला असतानाच कलाकारांनी ‘अखेरचा निरोप’ घेण्याच्या घटना मराठी रंगभूमीवर घडल्या आहेत. अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या धक्कादायक मृत्यूने ‘तोच खेळ पुन्हा एकदा’ पाहायला मिळाला आहे.

वि. वा. शिरवाडकर लिखित आणि ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ची निर्मिती असलेल्या ‘नटसम्राट’ नाटकाचा पहिला प्रयोग २३ डिसेंबर १९७० या दिवशी मुंबईत बिर्ला मातोश्री सभागृहात सादर झाला. नाटकात ‘विठोबा’ ही भूमिका करणारे कलावंत बाबूराव सावंत यांनाही नाटकाचा प्रयोग सुरू असताना मरण आले होते. ‘नटसम्राट’च्या तिसऱ्या अंकातील शेवटच्या प्रवेशाच्या वेळी सावंत यांच्या संवादानंतर डॉ. श्रीराम लागू यांचे नाटकातील शेवटचे स्वगत सुरू होते आणि त्या स्वगतावर नाटकाचा शेवट होऊन पडदा पडतो. त्या वेळी नाटकाचा पडदा पडता पडता इकडे आतमध्ये सावंत खाली कोसळले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा रंगमंचावरच मृत्यू झाल्याची आठवण त्या प्रसंगाचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितली.

नाटककार व अभिनेते नागेश जोशी, शंकर घाणेकर, राजा गोसावी, शाहीर विठ्ठल उमप आदी कलाकारांनाही अशाच प्रकारे मृत्यूने गाठले होते. ‘देवमाणूस’ नाटकाचे लेखक व नाटकातील प्रमुख भूमिकेत असलेले नागेश जोशी यांना एका प्रयोगाच्या वेळी असे मरण आले, तर अभिनेते शंकर घाणेकर यांनीही कोकणातील एका प्रयोगाच्या वेळी अखेरचा श्वास घेतला. ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकाचा प्रयोग मुंबईत दीनानाथ नाटय़गृहात होता. राजा गोसावी रंगभूषा करून तयार होते. प्रयोग सुरू होण्यापूर्वी रंगपटातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला होता.

शाहीर विठ्ठल उमप यांचे नागपूर येथे  हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने व्यासपीठावर ते कार्यक्रम सादर करत असतानाच अचानक खाली कोसळले आणि त्यांचे निधन झाले.

 

अश्विनी एकबोटे यांच्यावर अंत्यसंस्कार

पुणे : नाटय़-चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत प्रसिद्ध अभिनेत्री-नृत्यांगना अश्विनी एकबोटे पंचत्वात विलीन झाल्या. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकबोटे यांचे पार्थिव सकाळी भरत नाटय़ मंदिर आणि टिळक स्मारक मंदिर आवारातील नाटय़ परिषद पुणे शाखेच्या कार्यालयापाशी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

रणांगणावर वीरमरण यावे, असे सैनिकाचे आणि अभिनेता/अभिनेत्रीला चेहऱ्याला रंग लावलेला असताना रंगमंचावर मरण यावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. असे मरण भाग्याचे म्हटले जात असले तरी ते नशिबी यावे का? असा प्रश्न हे सगळे पाहून मनात येतो. माझ्यासाठी ते प्रश्नचिन्ह आहे, कारण सैनिक आणि त्या कलाकाराच्या कुटुंबीयांसाठी ते दुर्दैवी व धक्कादायकच आहे.

– मोहनदास सुखटणकर,ज्येष्ठ अभिनेते