News Flash

डॉ. गिरीश ओक यांचे ‘चिवित्रा’ख्यान यूटय़ूबवर

अग्गंबाई सासूबाई’ ही त्यांची लोकप्रिय मालिका सध्या बंद आहे.

डॉ. गिरीश ओक

मुंबई : टाळेबंदीचा हा काळ सर्जनशील कलावंतांना स्वस्थ बसू देत नाही आहे. त्यांच्या कल्पनांमधून नवनवे  उपक्रम ऑनलाइन माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. घरात बसून अशाच वेगवेगळ्या विषयांवर विचार करताना सध्या घराघरांतून शेफ अभिजीत राजे म्हणून लोकप्रिय झालेले अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनाही अशीच ‘चिवित्र’ कल्पना सुचली असून ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘चिवित्रा’ हे सदरलेखन ते यूटय़ूबवर नव्या रूपात लोकांसमोर आणणार आहेत.

रोजच्या धावपळीतल्या जगण्यात सुचलेले विषय, आलेले अनुभव यांची चिवित्रपणे नोंद घेत आपल्या खुमासदार शैलीत डॉ. गिरीश ओक यांनी २००३-०४ साली ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरा’ या पुरवणीत ‘चिवित्रा’ या सदरातून मांडले होते. त्याचे पुढे श्रीविद्या प्रकाशनने पुस्तकही प्रकाशित केले आणि ‘चिवित्रांगण’ या नावाने त्याचे जाहीर कार्यक्रमही त्यांनी केले. आता याच लेखांचे अभिव्यक्तिवाचन करून ते पुन्हा नव्या रूपात आणण्याचा विचार या टाळेबंदीच्या निमित्ताने सुचल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या घरातच असल्याने वेगळे काय करता येईल, यासंदर्भात विचार सुरू होते. अनेक सहकलाकार ऑनलाइन माध्यमातून काय-काय करत आहेत हेही पाहात होतो, त्या वेळी ही कल्पना सुचली. ‘चिवित्रा’चे २४ लेख माझ्याकडे तयार आहेत. त्यावर खास या लेखांसाठी म्हणून त्या काळी मंगेश तेंडुलकर यांनी काढलेली चित्रेही माझ्याकडे आहेत. शिवाय, मी जेव्हा ‘चिवित्रांगण’चे २००-३०० कार्यक्रम केले तेव्हा  त्यात नऊ लेखांचाच समावेश होता. त्यामुळे आता सगळे लेख घेऊन मी यूटय़ूबवर त्याचे वाचन करणार आहे, असे गिरीश ओक यांनी सांगितले.

घरीच एक कॅमेरा सेटअप के ला आहे, दुसऱ्या एका मोबाइलवर काही शॉट्स घेतो आणि आयफोनवर याचा आवाज रेकॉर्डिग करतो आहे. हे सगळे जुळवण्याचे काम आमचा संकलक अनुज करतो. त्याने तेंडुलकर यांच्या चित्रांचेही एक छान मोन्टाज करून दिले आहे. अशा तयारीने केलेला या ‘चिवित्रांगण’ कार्यक्रमाचा पहिला भाग १६ एप्रिलला गुरुवारी यूटय़ूबवर अपलोड करतो आहोत. त्यासाठी यूटय़ूबवर ‘चिवित्रा’ नावानेच स्वतंत्र वाहिनी सुरू के ली असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘अग्गंबाई सासूबाई’ ही त्यांची लोकप्रिय मालिका सध्या बंद आहे. लोकांची आवडती मालिका अचानक पाहता येईनाशी झाल्याने त्यांना हुरहुर लागली आहे. अनेक जण तुम्ही फेसबुकवर लाइव्ह का येत नाही, अशी विचारणाही करतात. तर त्या सगळ्यांसाठीच एक चांगला कार्यक्रम घेऊन त्यांच्यासमोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दर गुरुवारी हे चिवित्राख्यान न चुकता सादर करण्याचा मानसही गिरीश ओक यांनी व्यक्त के ला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 1:29 am

Web Title: actor dr girish oak article chivitra published in loksatta now on youtube zws 70
Next Stories
1 ‘सेव्हन हिल्स’साठी डॉक्टर, परिचारिकांची तात्पुरती भरती
2 स्वस्त धान्यासाठी रांगा
3 तीव्र मानसिक आजारांचे रुग्ण अडचणीत
Just Now!
X