अभिनेत्री करिष्मा कपूर आणि तिची आई बबिता कपूरने मुंबईतील आपले शानदार अपार्टमेंट १०.११ कोटी रुपयांना विकले. घर विक्रीनंतर करिष्मा कपूरचा त्या सेलिब्रिटी आणि उद्योगपतींमध्ये समावेश झालाय, जे स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात झाल्यानंतर घर विकून फायदा घेत आहेत.

‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल हैं’ सारखे एकाहून एक सरस हिट चित्रपट देणाऱ्या करिष्माने मुंबईच्या खार भागातील दहाव्या मजल्यावरील अपार्टमेंट विकले. झॅपकी डॉट कॉमने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, करिष्माने विक्रीचा हा व्यवहार करताना २०.२२ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली.

खार पश्चिमेला रोझ क्वीन येथे हे अपार्टमेंट आहे. कार पार्किंगच्या दोन जागा आहेत. आभा दमानी नावाच्या व्यक्तीने हे अपार्टमेंट विकत घेतले आहे. मुंबईच्या पॉश वांद्रे भागामध्ये हे अपार्टमेंट आहे. करिष्मा रहात असलेल्या फ्लॅटचा सध्या प्रति चौरस मीटरसाठी ५५ हजार रुपये असा दर आहे.

“बाजारभावाने या अपार्टमेंटची विक्री झाली. या भागात बांधलेल्या नव्या इमारतींमध्ये प्रति चौरस मीटर ६५ हजार रुपये असा दर आहे. समुद्राच्या दिशेने असलेल्या फ्लॅटचा प्रति चौरस मीटर दर ९० हजारच्या घरात आहे” असे रितेश मेहता यांनी सांगितले.