‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांचा आशावाद

मुंबई : अनेक संघटना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करतात. शेतकऱ्यांचे हित हीच सर्वाची भावना असते. पाणीसमस्या सोडविण्यासाठीही अनेकजण काम करत असतात. सर्वाचे काम चांगलेच असते. आज ना उद्या सारेजण एकत्र येऊन हे काम करतील, आणि पाणीसमस्या सोडविण्याची तळमळ असलेल्यांचा सुंदर सेतू तयार होईल, असे एक चित्र प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या हृद्य मनोगतात रंगविले, आणि ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमातील ‘आव्हान पाणीप्रश्नाचे’ या सत्राचा आशादायी समारोप केला.

‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात उपेक्षितांच्या, संकटग्रस्तांच्या पाठीशी भक्कम आधार उभे करणारे नाना पाटेकर यांनी आत्महत्याग्रस्त, गरीब शेतकरी कुटुंबीयांच्या संघर्षांपासून ग्रामीण भागातील पाणी प्रश्नापर्यंत अनेक समस्यांना तोंड देण्याकरिता नाम फौंडेशनने केलेल्या कामाची माहिती दिली. हे सारे आम्ही प्रसिद्धीसाठी केले नाही. या कामामुळे एक समाधान मिळाले, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना मांडल्या. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना तुटपुंजी आर्थिक मदत देऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करतानाच या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न फौंडेशनने केला. शेतीचा मूळ स्रोत असलेल्या पाण्याचा गहन प्रश्न सोडविण्यासाठी नदीच्या रुंदीकरणावर, खोलीकरणावर अधिक भर दिला. आता छोटे धरण आणि मोठे बंधारे बांधण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

तीन-साडेतीन वर्षांंपूर्वी गाडी घेण्यासाठी पैसे साठविले होते. एकेदिवशी टी. व्ही. वर शेतकऱ्याच्या आत्महत्येचे वृत्त पाहत असताना त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये मुलगा गेल्याच्या दु:खापेक्षाही संध्याकाळची भ्रांत पाहिली आणि पैसे साठवून गंमती करण्याऐवजी है पैसे समाजासाठी देऊन टाकू असे वाटले. मकरंद अनासपुरेला फोन केला. त्याला सांगितले की, प्रत्येक कुटुंबाला १५ हजार या प्रमाणे एक हजार धनादेश मी देतो ते या कुटुंबीयांना दे. दीड कोटींच्या धनादेशाचे वाटप झाले. तेथून नाम फौंडेशनचे काम सुरू झाले, याकडे पाटेकर यांनी लक्ष वेधले. शहरातील चाकरमान्यांनी यासाठी ६० कोटी रुपये दिले. त्यातून २०१६ मध्ये ५८५ किमी, २०१७ मध्ये ४७१ किमी आणि २०१८ मध्ये ८६० किमी असे सुमारे १९२६ किमी खोदकाम नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, लांबीकरणासाठी झाल्याची माहितीही त्यांनी दिली. सरकारी अंदाजानुसार या कामांसाठी ३०० ते ४०० कोटी खर्च झाले असते. परंतु ही कामे फक्त २२ कोटी रुपयांत झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. रत्नागिरी व कऱ्हाड येथे अनुक्रमे १५० व २० एकर भूखंड खरेदी करण्यात आला आहे. बियाणे, फवारणी आमची आणि राबायचे तुम्ही या तत्त्वावर फौंडेशनचे काम सुरू आहे. या सर्वांचा मूळ स्रोत पाणी आहे आणि या प्रत्येक कामात ६० टक्के भर पाण्यावर असल्याचेही नाना पाटेकर यांनी सांगितले. पाणी प्रश्नाबाबत निवृत्त अभियंत्यांनी केलेले चांगले प्रकल्प आणि ज्या प्रकल्पांना सरकारदरबारी किंमत मिळाली नाही, असे तयार प्रकल्प घेऊन परदेशात जात आहोत. तेथून मदत मिळवून ते प्रकल्प राबविण्याचा फौंडेशनचा प्रयत्न आहे. अनेकांकडे हात पसरून लोकांसाठी मदत मागण्यात आपल्याला काहीही गैर वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.

तीन वर्षांनंतर राजीनामा..

नाम फौंडेशनचे काम खूप मोठे आहे. परंतु या कामाचा तीन वर्षांनंतर मी राजीनामा देणार आहे. प्रत्येक निर्णय मी घेत राहिलो तर नवे नेतृत्त्व तयार होणार नाही. नवीन मुलं पुढे यावी आणि त्यांनी निर्णय घ्यावेत. ते बरोबर आहेत किंवा नाही यावर मला लक्ष ठेवता येईल, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.