बेकायदा पद्धतीने कॉल रेकॉर्ड्स अहवाल (सीडीआर) मिळवणाऱ्यांचे प्रकरण ठाणे पोलिसांकडून दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आणले होते. या प्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. यासाठी त्याच्यासह तीन जणांची चौकशी होण्याची शक्यता असून तशी नोटीस पोलिसांनी त्यांना पाठवली आहे. नवाजुद्दीनवर पत्नीच्या फोनवरील कॉल रेकॉर्ड्स बेकायदा पद्धतीने मागवल्याचा संशय आहे. या बेकायदा सीडीआर प्रकरणात जानेवारी महिन्यांत ठाणे पोलिसांनी देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडीत यांना अटक केली होती. आजवर या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली आहे.


या प्रकरणात काही राजकीय नेते आणि सेलिब्रेटींचाही समावेश असल्याचे पोलिसांनी यापूर्वीच सांगितले होते. आता यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा देखील समावेश असल्याचे समोर आल्याने त्याची चौकशी होणार आहे. ठाणे पोलिसांनी नवाजुद्दीनला चौकशीसाठी हजर होण्यासाठी नोटीस पाठवली होती. त्यानुसार तो शुक्रवारी हजर होणे अपेक्षित होते मात्र, तो हजर होऊ शकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवाजुद्दीनने आपल्या पत्नीच्या फोन कॉल्सचा रिपोर्ट बेकायदा पद्धतीने मागवला होता. हा सीडीआर मिळवून देण्यात नवाजुद्दीनला त्याचे वकिल अॅड. रिझवान सिद्दीकी यांनी मदत केली होती. यापार्श्वभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीला पुढील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते, मात्र ते चौकशीसाठी आले नाहीत, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.