पत्नी मान्यताची प्रकृती ठिक नसल्याचं कारण देत अभिनेता संजय दत्तला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
कारागृह प्रशासनाच्या नियमावलीनुसार संजय दत्तला १ ऑक्टोबर रोजी १४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्याच्या रजेला आणखी १४ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे २८ दिवस संजय दत्त आपल्या कुटुंबीयांसमवेत मुंबईमध्येच होता.
संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने शस्त्रास्त्र कायद्याखाली पाच वर्षे शिक्षा सुनावली असून, त्यापैकी त्याने अठरा महिन्यांची शिक्षा भोगली आहे. मे २०१३ पासून तो येरवडा कारागृहात उर्वरित शिक्षा भोगत आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी त्याने पूर्ण केला असल्यामुळे त्याला अभिवाचन रजा मंजूर करण्यात आली होती.