अभिनेता संजय दत्त यांचा आजच (२५ ऑगस्ट) राष्ट्रीय समाज पक्ष (रासप)मध्ये प्रवेश होणार होता. मात्र, काही कारणास्तव तारीख पुढे ढकलली गेल्याने, त्यांचा प्रवेश लांबला आहे. पण लवकरच ते रासपमध्ये येतील, अशी माहिती स्वतः रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली असल्याने, आता खरचं संजूबाबा रासपमध्ये प्रवेश करणार का? या चर्चांनी जोर धरला आहे. रासपच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याप्रसंगी जानकर बोलत होते.

यावेळी महादेव जानकर यांनी म्हटले की, ‘तारीख चुकल्याने संजय दत्त यांचा पक्ष प्रवेश पुढे ढकलला गेला आहे. पक्षप्रवेशासाठी संजय दत्त यांना २५ ऑगस्ट तारीख मागितली होती पण त्यांनी चुकून २५ सप्टेंबर तारीख नोंद केली. त्यामुळे त्यांचा आज प्रवेश होऊ शकला नाही. पण पुढच्या काळात ते पक्षात प्रवेश करतील.

राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर साजरा करण्यात आला. यावेळी प्रचंड शक्तिप्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या मेळाव्याला संबोधित करताना जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं.

विशेष म्हणजे,  रासपच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेता संजय दत्त यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एका व्हिडिओद्वारे या शुभेच्छा दिल्या आहेत. जानकर हे माझ्या भावासारखे असून त्यांना मी शुभेच्छा देतो. मी तिथे असतो तर नक्कीच पक्षाच्या मेळाव्याला आलो असतो, असं संजय दत्तने म्हटलं आहे.