03 March 2021

News Flash

शेखर नवरे यांचे निधन

गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर दादर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

अभिनेते शेखर नवरे यांचे सोमवारी रात्री मधुमेहाच्या आजाराने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. नवरे यांना उच्च मधुमेहाचा त्रास होता. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर दादर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना एकापाठोपाठ एक अवयव निकामी होत गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. दूरदर्शनवर गाजलेल्या ‘संस्कार’ या मालिकेची निर्मिती नवरे यांची होती. अनंत पणशीकर व अरुण होर्णेकर यांची निर्मिती असलेले ‘वोटिंग फॉर गोदो’ हे त्यांचे शेवटचे नाटक ठरले. नवरे यांनी ‘आंदोलन’ व ‘कोंडी’ या नाटकांची निर्मितीही केली होती. सई परांजपे यांच्या ‘आया अफसर’ या हिंदी नाटकातही त्यांनी काम केले होते.

‘तू फक्त हो म्हण’, ‘माझं काय चुकलं’, ‘एक होता शहाणा’, ‘आणि अचानक’, ‘मार्ग सुखाचा’, गिधाडे’, ‘धर्मपत्नी’ ही नवरे यांची गाजलेली काही नाटके. ‘खरा वारसदार’, ‘कुलदीपक’, ‘इरसाल कार्टी’, ‘गडबड घोटाळा’ या चित्रपटांमधून तसेच ‘घर’, ‘अस्मिता’, ‘कथा गंगेच्या धारा’ व अधिकारी बंधूंच्या अनेक मालिकांमधून त्यांनी  भूमिका केल्या होत्या. मंगळवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत नवरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकाच्या प्रयोगाच्या आधी शेखर नवरे हे रुग्णालयात दाखल झाले होते. मधुमेहामुळे त्यांच्या पायाचा अंगठा शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागला होता. रुग्णालयातून ते त्या अवस्थेत तालमीत सहभागी झाले होते. तालीम संपल्यानंतर पाहिले तर शस्त्रक्रिया केलेला त्यांचा पाय  रक्तबंबाळ झाला होता, अशी आठवण या नाटकाचे दिग्दर्शक अरुण होर्णेकर यांनी सांगितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 12:11 am

Web Title: actor shekhar navre expired
Next Stories
1 ‘मकरसंक्रांत आणि १४ जानेवारीचा काहीही संबंध नाही’
2 सहकारसम्राटांवरील बंदीची संक्रांत अटळ
3 राज्यातील ‘यूपीएससी’च्या उमेदवारांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना
Just Now!
X