नव्या वर्षांचा संकल्प, पण नाटकांची नावे गुलदस्त्यातच
जुन्या गाजलेल्या नाटय़कृतींचे सध्याच्या आघाडीच्या दिग्दर्शकांच्या सहभागाने, नामवंत कलाकरांच्या संचात, उत्तम निर्मितिमूल्ये सांभाळत आणि मोजक्याच प्रयोगांत पुन्हा एकदा ‘हब्रेरियम’ उपक्रमांतर्गत अभिनेते सुनील बर्वे यांनी काही नाटके सादर करण्याचे पुन्हा एकदा योजिले आहे. प्रेक्षकांमध्ये जुन्या गाजलेल्या नाटकांची उत्सुकता वाढत असल्याने नव्या वर्षांत जुनी गाजलेली नाटके सादर करण्याचे त्यांनी ठरविले आहे. तीन वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर ‘हब्रेरियम’ या अभिनव उपक्रमास लाभलेल्या उदंड प्रतिसादानंतर अभिनेते-निर्माते सुनील बर्वे यांनी नव्या वर्षांत काही अभिजात नाटय़कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण दे गा देवा’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळतंय’ आणि ‘झोपी गेलेला जागा झाला’ या पाच नाटकांचे प्रत्येकी २५ प्रयोग त्यांनी सादर केले होते. या प्रयोगांना रसिकांनी मनापासून पसंती दिल्याने पुन्हा काही नाटके सादर करण्याचा ‘सिलसिला’ बर्वे यांनी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरुषोत्तम दाव्र्हेकर लिखित ‘कटय़ार काळजात घुसली’ या जुन्या गाजलेल्या नाटकावर आधारित मराठी चित्रपटाने प्रचंड गर्दी खेचली. त्याचप्रमाणे वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’ या नाटय़कृतीवर लवकर सिनेमा येत आहे. तर २७ वर्षांपूर्वी मौलाचा दगड ठरलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकात कुलकर्णी दिग्दíशत नाटकाला आजही उंदड प्रतिसाद मिळत आहे. ही लाट येत्या वर्षांत कायम राहील असा रागरंग आहे. त्यामुळे जुन्या गाजलेल्या नाटकांची उत्सुकता वाढल असल्याचे लक्षात घेऊन पुन्हा एकदा काही नाटके सादर करण्यात येत असल्याचे जाणकार सांगत आहेत.
हब्रेरियम उपक्रमांतर्गत जुन्या अभिजात नाटय़कृतींचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार सुरू आहे. अनेक विषय हाताळले जात असून प्र‘योग’ जुळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आघाडीच्या दिग्दर्शकांसमेत काही विषयांवर चर्चा सुरू झाली आहे; परंतु सगळ्या गोष्टी प्राथमिक स्थरावर आहेत. नव्या वर्षांत काही जुन्या गाजलेल्या नाटय़कृतींचे प्रगोय सादर करण्याचा मानस असल्याचे अभिनेते-निर्माते सुनील बर्वे यांनी सांगितले, मात्र यात कोणत्या नाटकांचा समावेश असणार आहे याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी या नाटकांची नावे गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले.