अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या बातमीमुळे सगळं बॉलिवूड हादरलं. मात्र त्यानंतर काही दिवसातच सुशांतच्या मृत्यूमागे हिंदी सिनेसृष्टीतील घराणेशाही आणि गटबाजी आहे अशा बातम्या आणि वक्तव्यं येऊ लागली. काही प्रसारमाध्यमांनी ती वक्तव्यं प्रसारित केल्यानंतर मुंबई पोलिसांनीही या प्रकरणात लक्ष घातलंय. त्यामुळे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या विषयीच्या विविध बातम्या चर्चेत आहेत. अशीच एक बातमी समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्रे येथील घरामध्ये कालसर्प शांतीसाठी पूजा केली होती. सुशांत राजपूत कालसर्प पूजा करत असतानाचा व्हिडीओ ही पूजा ज्यांनी केली त्या पंडित नारायण शास्त्री यांनी व्हायरल केला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडीओ २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
ही कालसर्प शांती पूजा ज्या नारायण शास्त्री यांनी केली त्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. नारायण शास्त्री हे त्र्यंबकेश्वरचे पूजारी आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ (व्हिडीओ सौजन्य-नारायण शास्त्री)
जो व्हिडीओ व्हायरल झालाय त्यामध्ये सुशांत अत्यंत प्रसन्न मुद्रेने पूजा करताना दिसतो आहे. त्याच्यासोबत त्याची बहीण आणि मेहुणेही पूजेत दिसत आहेत. वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी कालसर्प शांती पूजा करण्यात आली होती असं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. सुशांतला सापांची भीती वाटत होती, त्याच्या स्वप्नातही साप यायचे म्हणून ही पूजा करण्यात आल्याचं बोललं जातं आहे. गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल २०१९ मध्ये ही पूजा करण्यात आली. सुशांतची जवळची मैत्री रिया चक्रवर्ती ही मात्र या व्हिडीओत दिसत नाही.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र सिनेसृष्टीतील अनेकांनी सुशांत सिंह राजपूतचा बळी हा घराणेशाही आणि सिनेसृष्टीतल्या गटबाजीने घेतला असं म्हटलं आहे. रिया चक्रवर्तीवरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवार या प्रकरणी तिची कसून चौकशीही करण्यात आली. आत्तापर्यंत सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ४० पेक्षा जास्त लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतने आत्महत्या केली नसून तो मानसिक लिंचिंगचा बळी ठरला आहे अशी टीका सर्वात आधी अभिनेत्री कंगना रणौतने केली होती. आता त्याच्या घरी झालेल्या कालसर्प योग शांती पूजेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 4:22 pm