मालवणी बोलीने अभिनयात दशावतार ते व्यावसायिक नाटक असा विनोदाचा एक अध्याय रचला, पण मालवणीच्याच पावलावर पाऊल टाकत कोकणातल्या ‘संगमेश्वरी’ या आणखी एका बोलीनेही मराठी मनोरंजन क्षेत्रात निखळ हास्याचे तुषार उडवले. या बोलीतील अस्सल शब्दसौष्ठवाची उधळण करत धमाल उडवणाऱ्या कलाकाराचे नाव आहे, वैभव मांगले.

अभिनेते वैभव मांगले ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादात गप्पांचा फड जमवणार आहेत. विविध व्यक्तिरेखांमध्ये सहज शिरणारा हा कलावंत संगीताच्या सुरांतही हरवून जातो आणि कुंचला घेऊन टाकाऊ वस्तूत रंगही भरतो. अभिनय, गायन, चित्रकला अशी मनमस्त भटकंती करणाऱ्या वैभव मांगले यांच्याशी गप्पा मारण्याचा हा ‘संगमेश्वरी’ योग शुक्रवारी, १८ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता ‘सहज बोलता बोलता’मध्ये साधता येईल. ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक  विजय केंकरे त्यांच्याशी संवाद साधतील.   वाचिक अभिनय, देहबोली आणि संवाद यांची अचूक सांगड घालत विनोदनिर्मिती करण्याचे उपजत कौशल्य असलेले वैभव मांगले यांनी स्वत:वर ‘विनोदी अभिनेता’ अशी छाप पडू दिली नाही. नाटक असो, मालिका असो वा चित्रपट, अभिनयाच्या प्रत्येक माध्यमात त्यांनी वेगळे प्रयोग करण्यावर भर दिला. विनोदी व्यक्तिरेखांबरोबरच खलनायकी, गंभीर व्यक्तिरेखाही त्यांनी लीलया पेलल्या, अविस्मरणीय केल्या.  कोकणच्या लाल मातीतील खेळे-नमन, जाखडी या लोककलांचा उपासक असलेल्या आणि अभिनय, गायन, चित्रकलेतही पारंगत असलेल्या वैभव मांगले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या कार्यक्रमाद्वारे होईल.

सहभागासाठी  https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_18Sept  येथे नोंदणी आवश्यक.