एकवीस देशांतून कलाकारांचा एकात्मतेचा संदेश

मुंबई : पडद्यामागील कलाकारांना मदत करण्याबरोबरच कलाकार मंडळी लघुपट, गाणी, मिम आदींच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत आहेत. सध्या ‘घे जबाबदारी, तू रहा ना घरी’ या गीताद्वारे कलाकार घरातच राहून सरकारला सहकार्य करण्याचा संदेश देत आहे. यात एकवीस देशांतील कलाकार आणि नागरिकांनी सहभाग दर्शविला.

यापूर्वी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘फॅ मिली’या लघुपटाद्वारे करोनाविषयी जनजागृती के ली होती. तर मराठीत समीर विद्वांस आणि हेमंत ढोमे यांनी कलाकारांना एकत्र आणत ‘तू चाल पुढं’ या गाण्याद्वारे वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांना मानाचा मुजरा के ला होता. आता दिग्दर्शक विजू माने यांनी ‘घे जबाबदारी’ हे गाणे तयार के ले आहे. गाण्याला अनुराग गोडबोले यांनी संगीत दिले असून ते नेहा राजपाल, अभिजीत कोसंबी, अनुराग गोडबोले, चिन्मय हुल्याळकर, रुपाली मोघे यांनी गायले आहे. या शिवाय यात भारत, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड, जपान, चीन, नेदरलँड, स्वित्र्झलड, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, आर्यलड, कॅनडा आदी २१ देशांतील नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले आहे.

‘सध्या करोना आणि टाळेबंदीमुळे जगभरात नैराश्याचे वातावरण आहे. माझे मित्र, श्याम सोनाळकर आणि मंगेश सावंत यांच्याशी चर्चा करताना गाण्याद्वारे सकारात्मक संदेश देण्याची कल्पना सुचली. करोनामुळे जगभरात अनेक नागरिकांनी प्राण गमावले आहेत.

म्हणून तेथील नागरिकांनाही सहभागी करून घेतले. यासाठी घरातच कलाकारांनी फोनवर चित्रीकरण के ले व संगीत, ध्वनी संयोजन केले. व्हॉट्सअ‍ॅप, व्हिडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दहा दिवसांत गाणे तयार झाले,’ असे विजू माने यांनी सांगितले. गाण्यात अभिनेता सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, संतोष जुवेकर, प्रिया बापट, सुमित राघवन, रवी जाधव, स्पृहा जोशी, मंगेश कदम, सुनील बर्वे, प्रसाद ओक आदी कलाकार सहभागी झाले आहेत.

गाण्याच्या माध्यमातून घरी राहण्याचे आवाहन

प्रसिद्ध गायिका लेडी गागा हिने ‘वन वर्ल्ड-टुगेदर अ‍ॅट होम कॉन्सर्ट’ या गाण्याच्या माध्यमातून लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. यात शाहरूख खान, प्रियांका चोप्रा, रोलिंग स्टोन, टेलर स्विफ्ट, बिली एलीश हे सहभागी झाले आहेत. अभिनेता सलमान खान यानेही ‘प्यार करोना’ नावाचे गाणे गायले असून साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केले आहे.