मुंबई  :  करोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मनोरंजनविश्वातील कलाकार स्वत:चे विलगीकरण म्हणजेच घरात स्वत:ला बंद करून घेत आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, सोनम कपूर, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा या कलाकारांनी सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरच्या जगाशी संपर्क तोडला

आहे. आपले परदेश- प्रसिद्धी दौरे, चित्रपट- मालिकांचे चित्रिकरण, रद्द करत घरातच जास्त वेळ व्यतीत करत आहेत.  या कालावधीत सुरक्षेचे उपाय घेत प्रेक्षकांनाही स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी करोनापासून वाचण्यासाठी विलग राहणे पसंत केले आहे. ते ९७ वर्षांचे असून अनेकदा त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांनी त्यांना लोकांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही सुरक्षेच्या कारणास्तव पुढील काही दिवस घरातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत मी  घरीच राहणार असल्याचे त्यांनी समाजमाध्यमाद्वारे सांगितले आहे. अनेक वर्षे बिग बी दर  रविवारी जलसा बंगल्यावर चाहत्यांची भेट घेतात. सावधगिरी बाळगत रविवारची चाहत्यांची भेटही रद्द केली आहे. प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांना एका हॉटेलमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ते लंडन दौऱ्यावरून परतले होते. जास्त वय असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच लंडनहून परत आल्याने तिनेही स्वत:ला घरात कोंडून ठेवले आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने करोनाच्या भीतीपोटी स्वत:ला अमेरिकेतील घरात बंद करून घेतले आहे. अभिनेता वरून धवनही छायाचित्रकाराशी सुरक्षित अंतर ठेवलेले पाहण्यास मिळत  आहे.  दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लोकांना भेटण्यास सक्त मनाई केली.