अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिच्याशी संवाद हिच्याशी संवाद

‘राधिका मसाले’ कंपनीची बॉस, गुरुनाथला वठणीवर आणणारी आणि शनायाला धडे शिकवणारी खमकी राधिका अशा वेगवेगळ्या रूपांत ती सध्या घराघरात ओळखली जाते, तिच्याविषयी चर्चा होते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील तीच ती वऱ्हाडी भाषेत आपला इंगा दाखवणारी राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते-केळकर ‘व्हिवा लाउंज’च्या व्यासपीठावर येणार आहे. टेलीविश्वात लोकप्रिय असलेल्या अनिताचा आजपर्यंतचा अनोखा अभिनय प्रवास या कार्यक्रमातून उलगडणार आहे.

‘लोकसत्ता’ आयोजित ‘केसरी’ प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’ या कार्यक्र मातून अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिचा रंगभूमी, चित्रपट आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांतील यशस्वी प्रवास उलगडणार आहे. बुधवारी, २३ मे रोजी ठाण्यात टिप टॉप प्लाझा येथे सायंकाळी ६.१५ वाजता ‘व्हिवा लाउंज’चा कार्यक्रम होणार आहे.‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून अनिता आता लोकप्रिय झाली असली तरी तिचा चेहरा प्रेक्षकांना नवीन नाही. याआधी ‘झी मराठी’वरच्याच ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेत तिने अश्विनीची भूमिका साकारली होती. नायिकेची मैत्रीण असलेली ही अश्विनी चांगलीच लोकप्रिय झाली होती. शालेय जीवनापासूनच अभिनयाची वाट धरलेल्या अनिताने पुण्यात ललित कला केंद्रातून अभिनयाचे धडे गिरवले. अभिनयाच्या क्षेत्रात आज उत्तम अभिनेत्री म्हणून नावाजलेली अनिता या क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी नाशिकहून मुंबईत आली. बहुतांशी मराठी कलाकार हे रंगभूमीवर काम करून मगच चित्रपट-टेलिव्हिजन क्षेत्रात शिरतात. अनितानेही नाटकांमधून काम केले आहे. मात्र तिथेही काम करताना सशक्त भूमिकांचा तिचा आग्रह होता. त्यामुळे अनेक प्रायोगिक  नाटकांमधून तिने काम केले आहे.

पुढे चित्रपटांतून काम करतानाही भूमिकांच्या बाबतीतला तिचा चोखंदळपणा कायम राहिला आहे. त्यामुळे ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘गंध’, ‘सनई चौघडे’, ‘जोगवा’सारख्या चित्रपटांमधून तिने भूमिका केल्या आहेत. सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘अय्या’ या हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. लोकप्रिय कलाकार होताना अभिनयाच्या जोरावरच संयमाची परीक्षाही कलाकारांना द्यावी लागते. या क्षेत्रातील संघर्ष तर उघडच आहे त्यामुळे अनिता दाते-केळकर ते आज टीव्हीवरची लोकांची लाडकी ‘राधिका’ या प्रवासात तिच्या वाटय़ाला आलेला संघर्ष कसा होता? कलाकार म्हणून तिची जडणघडण कशी झाली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनिता दाते-केळकर हिच्याचकडून जाणून घ्यायची संधी ‘व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहे.

हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने कार्यक्रमाला प्रवेश दिला जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.

  • कधी – बुधवार, २३ मे २०१८, सायंकाळी ६.१५ वाजता
  • कुठे – टिप टॉप प्लाझा, ठाणे</li>