मुंबई हे शहर देशातल्या इतर कोणत्याही शहरांपेक्षा महिलांसाठी सुरक्षित मानलं जातं. इतर शहरांपेक्षा इथे मुली जास्त प्रमाणात सुरक्षित आहेत असाच अनेकांचा समज असतो. पण गेल्या काही दिवसांपासून अशा काही घटना समोर येत आहेत की हे शहर महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न कोणत्याही महिलेला पडू शकेल. नुकताच अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनाही असाच काहीसा निंदनीय अनुभव आला आहे. एका बीएमडब्ल्यू गाडीच्या चालकाने चिन्मयी यांच्यासमोर हस्तमैथून करायला सुरूवात केली. पार्ले टिळक शाळेजवळ ही गाडी उभी होती. चिन्मयी यांनी या विकृत प्रकाराबद्दल त्या व्यक्तिला हटकलेही. त्या मारण्यासाठी त्याला पुढे सरसावल्या असता त्या अज्ञात व्यक्तिने तिथून पळ काढला. या सगळ्या प्रकारात चिन्मयी यांना त्या गाडीचे शेवटचे १९८५ हे ४ नंबरच टिपता आले. त्या चालकाने त्याने राखाडी रंगाचा सफारी घातला होता.

चिन्मयी यांचे पती अभिनेते सुमीत राघवन यांनी घडलेली संपूर्ण घटना ट्विटरवर शेअर केली शिवाय मुंबई पोलिसांकडे मदतीची मागणीही केली. यासंदर्भात चिन्मयी यांनी पोलिसांकडे रितसर तक्रारही केली. सुमित यांनी मुंबई पोलिसांना ट्विटमध्ये टॅग करत संपूर्ण प्रकार कथन करत या चालकाला लवकरात लवकर पकडणे गरजेचे असल्याचे म्हटले. सुधांशु पांडेच्या ट्विटला उत्तर देताना, ‘तेथे शालेय विद्यार्थिनीदेखील होत्या. त्यामुळे या इसमाने हा विकृत प्रकार त्यांच्यासमोरदेखील केला असा असावा,’ असा संशय सुमीत यांनी व्यक्त केला. सुमीतच्या या पोस्टनंतर पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला. चिन्मयी सुमीत यांना संपर्क केला असता त्या पोलीस स्थानकातच होत्या.