‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर अभिनेत्री इरावती हर्षे यांचा सल्ला

मुंबई : प्रगती होण्यासाठी ठरावीक कोशातून बाहेर पडलेच पाहिजे. अज्ञात क्षेत्रामध्ये ठसा उमटविण्याचा प्रवास अवघड असला तरी त्याकडे होणाऱ्या वाटचालीमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतात. अजून काय करू शकतो, हा प्रश्न स्वत:ला कायम विचारत राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री इरावती हर्षे यांनी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ कार्यक्रमात केले. ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ कार्यक्रम बुधवारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे पार पडला.

कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तिथे तुम्हाला नाउमेद करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. तसे स्वत:च स्वत:ला कमी लेखण्याची वृत्ती नैराश्य वाढण्यास अधिक कारणीभूत ठरते. अशा नैराश्यावर मात करण्याची आधीपासूनच तयारी असली पाहिजे, हे सांगत   डबिंगच्या क्षेत्राबाबतची आपली भीती मोडीत काढण्याचा अनुभव त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला.

सध्या समाजात लक्ष वेधून घेण्याची स्पर्धा सुरू आहे. दुसऱ्यांनी केलेल्या टीकेवरून आपले व्यक्तिमत्त्व ठरते का, याचा विचार करावा. इतरांच्या टीकेला महत्त्व देण्यापेक्षा स्वत:चे आत्मपरीक्षण करा, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. जुन्या चित्रपटांचे संवर्धन, जतन हे क्षेत्र करिअर म्हणून उदयास येत असून याला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मागणी असल्याचा उल्लेख करीत इरावती यांनी त्यांच्या ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’चे काम विस्तृतपणे मांडले. अभिनय क्षेत्रात येऊ  इच्छिणाऱ्यांनी वेगळ्या धाटणीचे, भाषांचे, प्रांतांचे सिनेमे पाहावेत. त्याचे बारकाईने निरीक्षण करावे. त्यातून नवनवीन मार्ग सापडतात, असे मार्गदर्शन त्यांनी या वेळी उपस्थितांना केले.

९०च्या दशकातील दैनंदिन टीव्ही मालिका आणि सध्याच्या आशयहीन मालिका याची तुलना करत सिनेमा क्षेत्रातील बदल, आव्हाने, वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची आणि आर्थिक गणिताची स्पर्धा, मुलांना चित्रपटाची भाषा समजून सांगणाऱ्या उपक्रमांची आवश्यकता अशा विविध विषयांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. या गप्पांचा सविस्तर वृत्तांत पुढील आठवडय़ातील ‘व्हिवा’ पुरवणीत वाचता येईल.