‘एमडी’च्या व्यसनाचा असाही बळी; अमली पदार्थ विक्रेत्यासह दोघांना अटक

‘एमडी’ या अमली पदार्थाच्या व्यवहारातील सहा हजार रुपयांची उधारी न दिल्याच्या कारणावरून मॉडेल, अभिनेत्री कृतिका चौधरी (२७) हिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा मुंबई पोलिसांनी सोमवारी केला. याप्रकरणी पोलिसांच्या विशेष पथकाने अमली पदार्थ विक्रेता शकील खान व त्याचा साथीदार बासू दास या दोघांना पनवेल, गोवंडीतून अटक केली. कृतिका शकीलकडून एमडी विकत घेत होती. या व्यवहारातील उधारीतूनच तिची हत्या झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

१२ जूनला जोगेश्वरीतील राहत्या घरी कृतिकाचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. परिमंडळ ९चे उपायुक्त परमजीतसिंग दहिया यांनी साहाय्यक आयुक्त अरुण चव्हाण, पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, उपनिरीक्षक दया नायक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले. हत्येनंतर कृतिकाच्या घरी पोहोचलेल्या पथकाला रक्ताळलेला शर्ट आढळला. तसेच कृतिकावर ज्या हत्याराने हल्ला घडला ती लोखंडी मूठही (फाईट) सापडली. इमारतीच्या सीसीटीव्हीत हत्येच्या रात्री दोन तरुण तिच्या घरी गेले, खाली आले हे दिसत होते. मात्र ती वेळ मध्यरात्री दोन ते तीनची असल्याने त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. फक्त त्यांचा बांधा, कपडे या अंदाजावर पोलीस आरोपींचा शोध घेत होते.

मित्रपरिवाराकडे केलेल्या चौकशीतून कृतिका एमडीच्या आहारी गेली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पतीपासून वेगळी झाल्यानंतर कृतिकाचे एका समव्यवसायी तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. या नात्याबाबत ती अतिशय हळवी होती. मात्र, प्रियकरासोबतच्या संबंधात कडवटपणा येऊ लागल्यानंतर कृतिका एमडीच्या आहारी गेली, असा तपशीलही पोलिसांना समजला होता. त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने वेगवेगळ्या बाजूने या हत्येचा तपास सुरू केला. गेल्या दोन वर्षांमध्ये कृतिकाने फोनवरून ज्या कोणाशी फोनवरून संपर्क साधला त्या प्रत्येकाकडे पथकाने कसून चौकशी केली. सुमारे साठेक अमलीपदार्थ विक्रेते आणि अडीचशेहून अधिक व्यक्तींची चौकशी करण्यात आली. याच दरम्यान, कृतिका आसीफ अली ऊर्फ सन्नी नावाच्या अमलीपदार्थ विक्रेत्याच्या संपर्कात होती, अशी माहिती पुढे आली. सन्नीला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. हत्या घडली तेव्हा तो अटकेत होता. त्यामुळे तपास पुन्हा खुंटला. परंतु, सन्नीचा साथीदार शकील हा गेल्या वर्षी जून महिन्यात कृतिकाच्या संपर्कात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार नालासोपारा येथे राहणाऱ्या शकीलला चौकशीसाठी बोलावण्यात आले. परंतु, शकील तेथून पसार झाला.

शकील नालासोपाऱ्यात भाडय़ाने राहत होता. त्यासाठी त्याने भलीमोठी रक्कम आगाऊ(डिपॉझिट) म्हणून भरली होती. ती न घेताच शकील पसार झाल्याने पथकाला त्याच्यावरील संशय बळावला. काही दिवस तो मालवणीत एका नातेवाईकाकडे वास्तव्यास होता. त्यानंतर त्याने पनवेल गाठले. ही माहिती मिळताच रविवारी रात्री पथकाने शकीलला पनवेलहून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. तसेच साथीदार दास याचा गोवंडी येथील पत्ताही सांगितला. त्यानुसार दासला अटक करण्यात आली.

‘त्या’ दिवशी काय घडले?

* सन्नी तुरुंगात गेल्यानंतर कृतिकाने शकीलकडून ‘एमडी’ खरेदी करण्यास सुरुवात केली. या व्यवहारातील सहा हजार रुपये ती शकीलला देणे लागत होती; परंतु गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शकीललाही अटक झाली.

* डिसेंबरमध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर शकीलने कृतिकाकडे सहा हजार रुपयांची मागणी केली; परंतु कृतिकाने त्याला दोन तीन वेळा टाळले. हत्येच्या दोन दिवस आधीही तो मध्यरात्रीच्या सुमारास कृतिकाच्या घरी गेला होता. तेव्हाही तिने त्याला ‘नंतर ये’ असे उत्तर दिले.

* हत्येच्या दिवशी तो दाससह कृतिकाच्या घरी धडकला. घराचे दार उघडेच असल्याने तो थेट आत शिरला. तेव्हा कृतिका एमडीच्या नशेत होती आणि फोनवर बोलत होती. शकीलने पैसे मागितले तेव्हा कृतिका त्याच्याशी उद्धटपणे बोलली व घरातून न गेल्यास आरडाओरडा करण्याची धमकी दिली.

* तेव्हा रागाच्या भरात शकीलने लोखंडी मुठीने तिच्यावर हल्ला केला. ती खाली पडली. तेव्हा दासने हाती लागलेल्या टॉवेलने तिचे तोंड दाबले. यात कृतिकाचा मृत्यू झाला.

* त्यानंतर कृतिकाच्या शरीरावरील हिरेजडित कानातले, अंगठय़ा, चेन आणि बावीसशे रुपये घेऊन या दोघांनी पळ काढला.