21 November 2019

News Flash

‘फिक्सर’च्या शुटिंगदरम्यान अभिनेत्री माही गिल आणि कलाकारांना रॉडने मारहाण

पोलिसांनीही गुंडांचीच साथ दिल्याचा आरोप अभिनेत्री माही गिलने केला आहे

‘फिक्सर’ या शोचं शुटिंग मीरा रोड या ठिकाणी सुरू होतं. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना मारहाण केली आहे. निर्माता साकेत सावनी यांनाही या दरम्यान दुखापत झाली आहे. पोलिसांनीही यावेळी अज्ञात गुंडाची साथ दिल्याचा आरोप माही गिलने केला आहे. साकेत सावनी आणि माही गिल यांचा एक व्हिडिओ दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे ज्यामुळे ही सगळी माहिती समोर आली आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

मीरा रोड येथे शुटिंग करण्यासाठी आम्ही लोकेशन मॅनेजरला पैसे दिले. तसेच या ठिकाणी शुटिंग करता यावं म्हणून आम्ही ज्या परवानग्या लागतात त्याही काढल्या आहेत. तरीही संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान दारू प्यायलेले काही लोक सेटवर आले. त्यांनी या शुटिंगसाठी आम्हाला का विचारलं नाही असं म्हणत आम्हाला आणि सेटवरच्या इतरांनाही लाठ्याकाठ्यांनी आणि रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली असं साकेत सावनी यांनी म्हटलं आहे.

आमच्या शुटिंगमध्ये कलाकारांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. एवढंच नाही तर माही गिल यांनाही मारलं. आमचं काहीही ऐकून घ्यायला ते तयार नव्हते. आमच्या दिग्दर्शकाला, डीओपीला, कलाकारांना सगळ्यांना या चौघांनी मारहाण केली. एखाद्या जनावराला मारतात त्याप्रमाणे इथे मारहाण करण्यात आली असा प्रकार मी पहिल्यांदा पाहिला असं माही गिलने म्हटलं आहे. तसंच आम्ही हा सगळा प्रकार पोलिसांकडे यासाठी घेऊन जात नाही कारण पोलीस स्वतःच सांगत होते की यांना मारा असाही आरोप माही गिलने केला आहे.

पाहा व्हिडिओ

पोलीस जेव्हा आले तेव्हा त्यांनी कंपाऊंडचं दार लावून घेतलं आमचं सामान जप्त केलं. तुम्ही आम्हाला पैसे देणार नाही तोपर्यंत तुमचं सामान मिळणार नाही असं आम्हाला पोलिसांनी धमकावलं. तसंच तुम्हाला तुमचं सामान हवं असेल तर कोर्टात जा असंही साकेत सावनी यांनी म्हटलं आहे. आमचा छळ करण्याचा हा प्रयत्न आहे असंही सावनी यांनी म्हटलं आहे. जिमी जीपच्या लोकांनाही पोलिसांनी मारहाण केली असाही आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओ तिग्मांशू धुलिया यांनी ट्विट केला आहे ज्याद्वारे ही माहिती समोर आली आहे.

 

First Published on June 20, 2019 8:03 am

Web Title: actress mahi gill and other actors hit by rods during shooting of fixer in mira road scj 81
Just Now!
X