कंपनीचा वितरक, कार मालकावर गुन्हा

कारचे मॉडेल, सीसी आणि अन्य तपशिलांत कागदोपत्री फेरफार करून भंगारात निघालेली बीएमडब्ल्यू कार अभिनेत्री सोनू वालीया यांना दुप्पट किमतीत विकण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कारच्या मूळ मालकासह कंपनीच्या अधिकृत शोरूम वितरकावर बांगूरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोरेगाव येथे राहाणाऱ्या वालीया यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात मॉडेस्ट कार डीलरचे मालक अन्वर र्मचट यांच्याकरवी ५२५डी, २९९३ सीसी असलेली निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार २० लाख रुपयांना खरेदी केली होती. मात्र, काही दिवसांतच गाडीत बिघाड झाला. तो दुरुस्त करण्यासाठी वालिया यांनी वरळी येथील बीएमडब्ल्यूच्या अधिकृत शोरूममध्ये ती आणली. मात्र, तपासणी केली असता ही कार १९९५ सीसीची असल्याचे उघड झाले. एवढेच नव्हे तर, ती ६० ते ७० हजार किमी धावली असल्याचेही उघड झाले.

सहा वर्षे जुनी, दोन हजार सीसीची आणि ६० हजार किलोमीटर प्रवास केलेली कार आठ ते १० लाखांपर्यंत उपलब्ध असताना र्मचट आणि कारचे मूळ मालक राजेश विनीगोटा यांनी फसवणूक केली नाही ना, हे जाणून घेण्यासाठी वालीया, त्यांचे दीर विनीत यांनी चौकशी सुरू केली. त्यासाठी त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि बीएमडब्ल्यू कंपनीतून माहिती मिळवली असता, फेरफार करण्यात आल्याचे उघड झाले.

याबाबत मूळ मालक राजेश यांना विचारणा केली असता त्यांनी बोरिवली येथील एका गॅरेजमध्ये कार डागडुजीसाठी दिली होती.

तेथे कारचे इंजिन बदलले असावे, असा दावा केला. तर कार डीलर र्मचट यांनी व्यवहार होण्याआधीच योग्य तपासणी का केली नाही, असा उलटा प्रश्न केल्याचे वालीया यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

एक महिन्याआधी म्हणजे एप्रिल महिन्यात ही कार मूळ मालक राजेश यांनी ही कार राजेशकुमार यादव यांना विकल्याची नवी माहिती समोर आली. व्यवहार करताना कारने १६ हजार किलोमीटर प्रवास केल्याचे सांगण्यात आले होते.

विशेष म्हणजे शोरूममध्ये सुरुवातीला कारचे इंजिन तीन हजार सीसी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, वालिया यांनी अधिक खोलात चौकशी सुरू केल्याने शोरूम व्यवस्थापकाने कार दोन हजार सीसीचे असल्याचे मान्य केल्याचे वालिया यांनी सांगितले.

आणखी ग्राहकांची फसवणूक?

कारचे मूळ इंजिन, त्यात कागदोपत्री केलेले फेरफार आणि हे बदल कशासाठी याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती बांगूरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय बाणे यांनी दिली. शोरूममधून अशा प्रकारे फेरफार करून अन्य वाहनांची विक्री करण्यात आली का, याचाही तपास सुरू असल्याचे बाणे यांनी स्पष्ट केले. शोरूममधून विकलेली कार काही वर्षांनी जास्त किमतीला अन्य व्यक्तींना विकता यावी या उद्देशाने फेरफार करण्यात आले असावेत. हा अवैध कारभार संगनमताने सुरू असावा, असा संशय विनीत यांनी व्यक्त केला आहे.