अपघातांचे वाढणारे प्रमाण रोखण्यासाठी मद्यपी चालकांवर अधिक कठोर कारवाई करण्याच्या हेतूने मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या ताफ्यात लवकरच ९१ नवी अत्याधुनिक ब्रेथ अ‍ॅनालायझर येणार आहेत. या यंत्राचे वैशिष्टय़ म्हणजे त्याला असलेला कॅमेरा आणि जीपीएस यंत्रणा. त्यामुळे मद्यपी चालकाचे छायाचित्र, त्याचा तपशील आणि ज्या ठिकाणी गुन्हा केला ते ठिकाण एका क्लिकवर उपलब्ध होऊन तात्काळ खटला उभा करणे शक्य होणार आहे.
वाहतूक शाखेचे सहआयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर विजय कांबळे यांनी पहिल्यांदा मद्यपींविरुद्ध जोरदार कारवाई सुरू केली. ही कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी सहआयुक्त विवेक फणसाळकर आणि उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे नवे कॅमेराबद्ध ब्रेथ अ‍ॅनालायझर. या यंत्रामुळे पोलिसांना मद्यपी चालकाविरुद्धचा संपूर्ण तपशील तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अहवालाची वाट पाहण्याचीही गरज नाही, असे दिघावकर यांनी सांगितले.
मद्यपी चालकाची चाचणी सकारात्मक आल्यानंतर त्याला नजीकच्या पोलीस ठाण्यात नेले जाते.  वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला जातो. मात्र नव्या प्रणालीमुळे हे काम सोपे होणार आहे.
अशा चालकांविरुद्ध खटल्यांचा लवकरच निकाल लागावा, यासाठी मुंबईत पाच मोबाईल न्यायालये सुरू करण्यात यावीत, अशी मागणी करणारे पत्र मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. शिंदे यांना पाठविले असून त्याला
न्या. शिंदे यांनी मान्यता दिली आहे.