आंदोलनापासून अलिप्त असल्याचे भासविणाऱ्या शरद राव यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे बुधवारीही मुंबईकरांना बस सेवेपासून वंचित राहावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांचा कळवळा दाखवणाऱ्या राव यांना मुंबईकरांची जराही काळजी नसल्याची टीका केली जात आहे.
नव्या वेळापत्रकाच्या वादावरून रातोरात वाहक-चालकांनी कामावर रुजू व्हायचे नाही, असा निर्णय घेतला. बेस्टमधील तब्बल २६ हजार चालक-वाहकांना कामावर जायचे नाही हा संदेश कसा मिळाला, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, अशी भूमिका बेस्टमधील सर्वच कामगार संघटनांनी घेतली आहे.
या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी सकाळी ११ वाजता कामगार संघटनांना बेस्टच्या मुख्यालयात बोलावले होते. परंतु कामगार संघटनांचा एकही प्रतिनिधी तेथे फिरकला नाही. सत्ताधारी शिवसेनाप्रणित कामगार संघटनेचे नेतेही मूग गिळून बसले होते. मात्र या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे श्रेय लाटण्यासाठी राव यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले ़ आपण या आंदोलनाची घोषणा केलेली नाही, मात्र आम्ही कामगारांच्या पाठीशी आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली.