भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा आपल्या नावावर करण्यासाठी अदानी समूह १० हजार कोटी रुपये खर्च करण्यास तयार असल्याचे समजते. तर उर्वरित आठ हजार कोटींमध्ये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूमधील विमानतळ विकसित करण्याचा अदानी समूहाचा विचार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारी महिन्यामध्येच अदानी समूहाला सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५० वर्षांचे कंत्राट मिळाले आहे. सध्या एमआयएएलचे १३.५ टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. तसेच भविष्यात आपल्या मालकी वाढवण्यासाठी समूहाने १० हजार कोटींची तरतूद करुन ठेवली आहे. मात्र सध्या विमानतळाचा कारभार पाहणाऱ्या जीव्हीके कंपनीने अदानी समूहाच्या या हिस्सेदारीला विरोध करणारी याचिका कोर्टात दाखल केली आहे. मूळची दक्षिण आफ्रिकेची असणाऱ्या जीव्ही ग्रुपकडे सध्या एमआयएएलचे ५०.५० टक्के हिस्सेदारी आहे. त्याशिवाय बिडवेस्टकडे १३.५ टक्के आणि एसीएसए ग्लोबल लिमीटेडकडे १० टक्के हिस्सेदारी आहे. मागील १३ वर्षांपासून या कंपन्या एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कारभार हाताळत आहेत.

बिझनेस स्टॅण्डर्सने दिलेल्या वृत्तानुसार या व्यवहारासाठी अदानी समूह १० हजार कोटी गुंतवण्यास तयार असून ते कायदेशीर निकालाची वाट पाहत आहेत अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. बिडवेस्टने त्यांच्या मालकीची सर्व हिस्सेदारीचे हक्क अदानी समूहाला विकण्याची तयारी दर्शवली आहे. विमानतळाची किंमत आठ हजार कोटी गृहित धरुन बिडवेस्टने ७७ रुपये प्रती समभाग या दराने सर्व हक्क एक हजार २४८ कोटींना विकण्याची तयारी दर्शवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिडवेस्टने आधी आपल्या मालकीचा हिस्सा जीव्हीके समूहाला विकण्याचे ठरवले होते. मात्र नियोजित वेळेत जीव्हीकेला व्यवहार पूर्ण करता आला नाही. त्यामुळे हे प्रकरण अदानी समूहाने हे प्रकरणात राष्ट्रीय लवादाला लक्ष घालण्याची विनंती केली. लवादाने जीव्हीके समूहाला ३० सप्टेंबरपर्यंत व्यवहार पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यानंतर व्यवहार पूर्ण करण्याचा कालवाधी ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

याशिवाय मुंबई उच्च न्यायालयामध्ये अदानी समूह आणि जीव्हीके समूहामध्ये वाद सुरु आहे. बिडवेस्टला मुंबई विमानतळाची स्वत:च्या मालकिची हिस्सेदारी अदानी समूहाला विकायची इच्छा आहे तरी जीव्हीके त्यामध्ये अडथळे आणत असल्याचा आरोप अदानी समूहाने केले आहे. दरम्यान केवळ बिडवेस्टच नाही तर जीव्हीकेच्या मालकिची हिस्सेदारीही विकत घेण्याचा अदानी समूहाचा विचार आहे. असं झाल्यास संपूर्ण मुंबई विमानतळ अदानी समूहामार्फत चालवण्यात येईल. दरम्यान जीव्हीकेने खोटी बिलं दाखवून घोटाळा केल्याचा आरोप एका विलस ब्लोअरने केल्यानंतर कंपनी व्यवहार मंत्रालयाने यासंदर्भात चौकशी करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते.

फेब्रुवारीमध्ये मिळवले सहा विमानांचे कंत्राट

भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील सहा छोटय़ा विमानतळांच्या लिलावाची प्रक्रिया खासगी-सार्वजनिक हिस्सेदारीद्वारे गेल्या वर्षी सरकारने सुरू केली होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये यासंदर्भातील निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने घेतला. या निविदेत अदानी समूहाने बाजी मारली. समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम, गुवाहाटी आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले. मात्र केरळ सरकारने याविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करत तिरुअनंतपुरम विमानतळ कोणत्याही खासगी कंपनीला चालवण्यास देणार नाही अशी भूमिका घेतली होती. पुढील ५० वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असेल. अदानीच्या स्पर्धेत दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाचे परिचलन करणाऱ्या जीएमआरची निविदा कमी रकमेची असूनही अदानीची निवड झाली. या पाच विमानतळाकरिता १० कंपन्यांच्या ३२ तांत्रिक निविदा आल्या होत्या. पैकी कंत्राटविजेत्या अदानी कंपनीने या कंत्राटाच्या माध्यमातून हवाई क्षेत्रातही शिरकाव केला. अदानी समूह सध्या बंदर, जहाज, ऊर्जा तसेच अन्य पायाभूत क्षेत्रात कार्यरत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani group offers rs 10000 crore to buy mumbai airport stake report scsg
First published on: 23-10-2019 at 15:28 IST