भारतात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींना भारत सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, आत्तापर्यंत देशात झालेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक लसीकरण हे अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीचं झालं आहे. काही दिवसांपूर्वीच अदर पूनावाला यांनी कोविशिल्डच्या डोसची किंमत वाढवल्याची घोषणा केली होती. त्यावरून देशात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना त्यावरून अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर यानं थेट सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनाच सवाल केला आहे. कोविशिल्ड लसीच्या वाढलेल्या किंमतीवरून फरहान अख्तरने अदर पूनावालांना विचारणा केली आहे.

 

१५० रुपये प्रतिडोसनेही नफा होत असताना…!

फरहान अख्तरनं ट्विट कूरून यामध्ये सिरम इन्स्टिट्युटला टॅग केलं आहे. “करोनाची व्हॅक्सिन १५० रुपये प्रतिडोस विकल्यानंतर देखील नफा कमावल्याचं तुम्ही म्हणालात. पण आता आम्हाला जगात कोविशिल्डच्या लसीसाठी सर्वाधिक किंमत मोजावी लागणार आहे. कृपया समजावून सांगा असं का?” असं फरहान ट्विटमध्ये म्हणाला आहे. ट्वीटसोबत फरहानने इंडियन एक्स्प्रेसची एक बातमी देखील पोस्ट केली आहे.

काय म्हटलंय बातमीमध्ये?

अदर पूनावाला यांनी सुरुवातीला १५० रुपये प्रतिडोस व्हॅक्सिन विक्री करतानाही नफा कमावत असल्याचं सांगितलं होतं. पूनावाला यांनीच सुरुवातीचे १० कोटी डोस फक्त २०० रुपयांच्या विशेष किंमतीमध्ये दिले जातील आणि नंतर हीच लस खासगी बाजारपेठेमध्ये १ हजार रुपये प्रतिडोस विक्रीसाठी दिली जाईल, असं देखील म्हटलं होतं. मात्र, सिरमनं नुकतीच जाहीर केलेली ६०० रुपये प्रतिडोस किंमत अर्थात ८ डॉलर प्रतिडोस ही किंमत जगात इतर कुठेही सिरमची लस असलेल्या देशांमध्ये सर्वाधिक ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

सौदी अरेबिया, द. आफ्रिकेतही इतकी किंमत नाही!

Astrazeneca आणि Oxford यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या Covishield लसीचं उत्पादन पुण्यातील Serum इन्स्टिट्युटच्या प्लांटमध्ये होत आहे. ही लस अमेरिका, ब्रिटन आणि युरोपातील काही देशांमध्ये वितरीत केली जात आहे. मात्र, या देशांमध्ये देखील कोविशिल्डसाठी इतकी किंमत मोजावी लागत नसल्याचं दिसून येत आहे. बांगलादेश, सौदी अरेबिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील कोविशिल्डची एवढी किंमत नसल्याचं देखील स्पष्ट झालं आहे. १ मे पासून कोविशिल्डचे नवे दर लागू होणार असून राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील सधन नागरिकांना लस विकत घेण्याचं आवाहन केलं आहे.