कस्टमचे अतिरिक्त आयुक्त शक्तीवेल राजू अटकेत

भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी आणि कस्टमचे अतिरिक्त आयुक्त शक्तीवेल राजू (४२) चालवत असलेल्या भरधाव कारने ‘मॉर्निंग वॉक’साठी निघालेल्या दोघांना उडवले. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास मानखुर्द परिसरात घडलेल्या या अपघातात एक पादचारी जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानखुर्द पोलिसांनी राजू यांना सदोष मनुष्य वधाच्या गुन्हात अटक केली. न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले.

पोलीस चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री आजारी मित्राची विचारपूस करण्यासाठी राजू अंधेरीला गेले. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ते अंधेरीहून नवी मुंबईतील घरी जाण्यासाठी निघाले. कस्टम विभागाने अधिकाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर घेतलेली अर्टिगा कार राजू स्वत: चालवत होते. घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरून सायन-पनवेल महामार्गावर लागल्यानंतर लगेचच त्यांच्या कारने पांडुरंग कोकरे (४०), अशोक भंडारी (५५) या दोघांना धडक दिली. यात कोकरे यांचा जागीच मृत्यू झाला. कोकरे आणि भंडारी मानखुर्दच्या सोनापूरचे रहिवासी आहेत.

दोघांना धडक देऊन कार रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबाला जाऊन आदळली. तेथून जवळच मानखुर्द पोलिसांची बीट चौकी आहे. शिवाय अपघात घडला तेव्हा मानखुर्द पोलिसांचे गस्तीवरील पथकही आसपासच होते. त्यामुळे अपघाताची माहिती लगोलग मिळाली. जागेवर थांबलेल्या आरोपीला (राजू) ताब्यात घेत दोन्ही जखमींना उपचारार्थ राजावाडी रुग्णालयात दाखल केले गेले. आरोपीला सदोष मनुष्यवध, बेदरकारपणे वाहन चालवणे, जखमी करणे या कलमांतर्गत अटक करण्यात आली, अशी माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय वेरणेकर यांनी दिली.

अटकेनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातून आरोपी दारूच्या नशेत नव्हता, असे निदान झाले. मात्र खातरजमा करण्यासाठी आरोपीच्या रक्ताचा नमुना न्यायवैद्यक प्रयोगशाळेत धाडल्याचे परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी लोकसत्ताला सांगितले.

अटकेनंतर पोलिसांनी राजू यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. अपघात घडला, आपल्या कारने दोघांना उडवले याची जाणीव कार विजेच्या खांबाला धडकली तेव्हा झाली, असा दावा केला. अपघात कसा घडला हे जाणून घेण्यासाठी पोलीस राजावाडी रुग्णालयात उपचार घेत असलेले जखमी भंडारी यांचा जबाब नोंदवून घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. याशिवाय प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची शोधाशोध पोलिसांनी सुरू केली आहे. सायन-पनवेल मार्गावरील सीसीटीव्हींचे चित्रणही पाहाण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या चौकशी व तपासातून राजू यांना डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याच्या निष्कर्षांवर मानखुर्द पोलीस पोहोचले आहेत.

अपघातग्रस्त कार ही कस्टम विभागाने भाडय़ाने घेतली होती. त्यावर असलेल्या चालकाला सोमवारी रात्री राजू यांनी घरी धाडले आणि कार स्वत:च्या ताब्यात घेतली. राजू यांनी चौकशीत दिलेली माहिती पडताळण्यासाठी मानखुर्द पोलीस चालकाचा जबाब नोंदवणार आहेत. शिवाय राजू यांनी सांगितलेल्या घटनाक्रमही पडताळणार आहेत.

एअर बॅगमुळे वाचले

प्रचंड वेगात कार विजेच्या खांबावर आदळूनही आरोपी राजू यांच्या शरीरावर ओरखडाही उठलेला नाही. प्रत्यक्षात त्यांच्या विभागाने पुरवलेल्या कारमधील एअर बॅगमुळे राजू थोडक्यात बचावले, असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. कोकरे, भंडारी यांना धडक दिल्यानंतर राजू यांच्या कारमधील एअर बॅग क्षणात बाहेर आल्या. त्यामुळे कार विजेच्या खांबावर आदळल्याचा धक्का राजू यांना बसला नाही.

परवान्याशिवाय कार चालवली

अपघातानंतर राजू यांच्याकडे चौकशी करणाऱ्या मानखुर्द पोलिसांनी ‘ड्रायव्हिंग लायसेन्स’बाबत विचारणा केली. तेव्हा परवाना आहे पण सोबत नाही, असे उत्तर राजू यांनी दिले. ते परवान्याशिवाय ही कार चालवत होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिली. त्यांच्याकडे परवाना आहे का याचीही पडताळणी केली जाईल, असे हा अधिकारी म्हणाला.