25 October 2020

News Flash

ओबीसींनाही अतिरिक्त सवलती?

भटके -विमुक्त, एसबीसी बेदखल

संग्रहित छायाचित्र

भटके -विमुक्त, एसबीसी बेदखल

मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला मिळणारे आरक्षण तसेच इतर सवलतींची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, तसेच अतिरिक्त सवलती देण्याबाबत अभ्यास करून शासनाला शिफारस करण्यासाठी अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीच्या कार्यकक्षेत विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्गाचा ( एसबीसी) समावेश करण्यात आलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे समाजात अस्वस्थता आहे. आरक्षणाच्या मागणीवरून राज्य सरकारच्या विरोधात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आले.

मात्र न्यायालयात हा विषय असल्यामुळे आरक्षणाबाबतचा अंतिम निकाल लागेपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याच वेळी ओबीसी समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, असा काही संघटना व नेत्यांनी तक्रारीचा सूर लावला.

त्याचीही दखल घेऊन ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर अभ्यास करून आणखी काही अतिरिक्त  सवलती, लाभ देता येतील का, याचा अभ्यास करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, इतर बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड आणि पाणीपुरठामंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या इतर बहुजन कल्याण विभागात इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती, भटक्या जमातींचा समावेश आहे. परंतु समितीच्या अभ्यासाची कार्यकक्षा फक्त ओबीसींपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात  येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:19 am

Web Title: additional facilities to obcs too zws 70
Next Stories
1 व्यायामशाळा दसऱ्यापासून..
2 भानु अथय्यांचा चित्रप्रवास शोधणारा लिलाव
3 निवृत्त पोलीस अधिकारी टी. के. चौधरी यांचे निधन
Just Now!
X