सूर्या प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्ण; कामाचा वेग वाढविण्याचे आदेश

मंगल हनवते
मुंबई : वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची पाणीसाठा क्षमता वाढविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रकल्प हाती घेतला आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचा पहिला टप्पा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्ण करून वसई-विरारला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. त्या दृष्टीने कामाचा वेग वाढवून नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश गुरुवारी एमएमआरडीएने कंत्राटदाराला दिले आहेत.

वसई-विरार आणि मीरा-भाईंदरमधील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावून तेथील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १३२५.७८ कोटी रुपयांचा सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत ४०३ दशलक्ष लिटर क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली. हे काम ३४ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक तांत्रिक अडचणी, भूसंपादन आणि इतर अडचणींमुळे प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. या  पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या कामाचा आढावा गुरुवारी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन घेतला.

सुमारे १.७ कि.मी. लांबीच्या मेंढवखिंड बोगद्याच्या कामाची पाहणी महानगर आयुक्तांनी केली. तसेच अधिकारी आणि कंत्राटदारांची बैठक घेतली. या बैठकीत कामाचा वेग वाढविण्याचे आदेश त्यांनी दिले. आतापर्यंत प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. कामाचा वेग आणि सद्य:स्थिती पाहता काम पूर्ण होण्यास २०२४ उजाडण्याची शक्यता आहे; पण यापूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे. यानुसार पहिला टप्पा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये पूर्ण करून वसई-विरारला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर वर्षभरात २०२३ मध्ये मीरा-भाईंदरला पाणीपुरवठा करून प्रकल्प पूर्ण केला जाईल, असेही श्रीनिवास यांनी सांगितले.