मुंबईकरांसाठी पाण्याचा पुरेसा साठा तलावांमध्ये उपलब्ध असतानाही २००९ मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा घाट घालण्यात आला आणि कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी नियोजित काळ उलटून गेल्यानंतर तब्बल १९ दिवस विलंबाने वाऱ्याचा वेग आणि दिशादर्शक यंत्रे खरेदी करण्यात आली, असा ठपका पालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी प्रशासनावर ठेवला आहे.
मुंबईमध्ये २००९ मध्ये कमी पाऊस झाल्यामुळे पालिकेने तानसा आणि मोडकसागर तलावांच्या क्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि या कामासाठी मेकॉनी एन्टरप्रायझेस कंपनीची नियुक्ती केली. तलाव क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी २० वेळा प्रयत्न करण्याचे निश्चित झाले आणि त्यासाठी पालिकेचे १९ लाख ६ हजार ४१० रुपये खर्च झाले.
तानसा तलावक्षेत्रात ६ ऑगस्ट २००९ ते ६ ऑक्टोबर २००९ या काळात २५ मि. मी. पाऊस पाडण्यासाठी प्रयोग करण्यात आला, पण पाऊस पडलाच नाही. तर मोडकसागरमध्ये तीन दिवसांचा अपवाद वगळता पाऊस पडलाच नाही, असे तानसा आणि मोडकसागर येथील सहायक अभियंत्यांनी आपल्या १० नोव्हेंबर २००९ रोजीच्या अहवालात नमूद केल्याचे मुख्य लेखापरीक्षकांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.