सर्व आर्थिक व्यवहारांकरिता आधार कार्ड सक्तीचे केले जाणार असल्याची चर्चा असल्याने ते बनविण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे. निवृत्तीवेतनासाठी ते महत्त्वाचे ठरणार असल्याने अनेकज्येष्ठ नागरिकही हे कार्ड मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांचे वृद्धत्व आधार कार्डाच्या आड येत असून, ते त्यांच्यासाठी निराधार ठरत आहे.
आधार कार्डच्या कामासाठी सध्या विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बँकांच्या शाखांमध्ये केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, तेथील काम सुरळीतपणे सुरू नसल्याने अनेक जण त्रस्त आहेत. त्यात वृद्धांची संख्या मोठी आहे. कारण आधार कार्डसाठी आवश्यक असणारे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेण्यात येणारे हातांचे ठसे देणे ही त्यांच्यासाठी कठीण, अशक्यप्राय गोष्ट ठरत आहे.
बी.एड्. महाविद्यालयातून शिक्षक म्हणून निवृत्त झालेले रमेश जोशी हे काही दिवसांपूर्वी नजीकच्या ‘आयडीबीआय’ बँकेत उभारण्यात आलेल्या केंद्रावर आधार कार्ड बनविण्यासाठी गेले होते. त्यांची मुलगी ‘आयडीबीआय’ बँकेच्या प्रभादेवी शाखेतच नोकरीला असल्याने तिने आपल्या वडिलांना याच बँकेत आधार कार्डसाठी नोंदणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ‘आयडीबीआय’ बँकेतील केंद्रावर ८१ वर्षांचे जोशी पत्नीसह पोहोचले. मुलगीसुद्धा त्यांच्याबरोबर होती. नाव, पत्ता आणि इतर व्यक्तिगत माहिती देण्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हाताचे ठसे घेण्याची वेळ आली. एकदा, दोनदा, तीनदा असे करीत १५ मिनिटे उलटली, तरी जोशी यांच्या हाताच्या बोटांचे ठसे काही ते इलेक्ट्रनिक मशीन स्वीकारत नव्हते. या केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या दोन मुलींनी विविध शक्कल लढविल्या. परंतु जोशी यांचे ठसे काही उमटत नव्हते. परिणामी कामही खोळंबळले. अखेर तेथील दोन्ही मुलींनी जोशी यांना तुमचे कार्ड तयार होऊ शकत नाही, असे सांगितले. जोशी यांच्या पत्नीच्या बाबतीतही याचीच पुनरावृत्ती झाली. याला पर्याय काय, अशी विचारणा जोशी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केली. परंतु, आम्हाला त्याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. तुम्ही आधार कार्डच्या तक्रारींसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधा, असे सांगत त्या मुलींनी पुढच्या व्यक्तीची नोंदणी करण्यास सुरुवात केली. परंतु, यातून काही तरी मार्ग असेल ना, असे पुन्हा पुन्हा विचारल्यावर वृद्धांच्या हाताच्या बोटांचे ठसे उमटविण्याबाबत सतत अडचणी येत असल्याचे त्या मुलींकडून सांगण्यात आले.
निराश होऊन घरी परतलेल्या जोशी यांनी हेल्पलाइनवर संपर्क साधला. मात्र, दूरध्वनी उचलला न गेल्याने शंकेचे निरसन होऊ शकले नाही. जोशी यांनी दुसऱ्या केंद्रावर जाऊन पुन्हा प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. परंतु तेथेही तोच प्रकार घडला तर ‘आधार’विनाच राहायचे काय, असा प्रश्न त्यांना भेडसावतो
आहे.      
उपायांच्या प्रतीक्षेत लाखो वृद्ध
जोशी यांचे उदाहरण हे प्रातिनिधिक आहे. त्यांच्यासारख्या तसेच त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या म्हणजे साठी व सत्तरीतील वृद्धही या समस्येने ग्रस्त आहेत. मात्र, या तिढय़ामागील कारणे शोधण्याचे तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यावर उपाय  सुचवावेत, असे मात्र एखाद्या सरकारी वा स्वयंसेवी संस्थेला अद्याप वाटलेले नाही. या उपायांच्या प्रतीक्षेत लाखो वृद्ध आहेत.