राज्यात २५ शाखांचे नियोजन
अल्प उत्पन्न गटाचे घराचे स्वप्न गृहकर्ज उपलब्ध करून साकारणाऱ्या आधार हाऊसिंग फायनान्सला महाराष्ट्रात वाढीच्या मोठय़ा शक्यता दिसत असून, पहिल्या दोन वर्षांतच म्हणजे मार्च २०१७ पर्यंत ३०० कोटी रुपयांचे गृहकर्ज वितरणाचे लक्ष्य तिने ठेवले आहे. डीएचएफएलची अंगीकृत कंपनी असलेल्या ‘आधार’ने मे २०१५ पासून महाराष्ट्रात व्यवसाय विस्तार केला आहे.
देशातील सर्वाधिक आणि वेगाने नागरीकरण सुरू असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राबाबत कंपनीला मोठय़ा आशा असल्याचे ‘आधार’चे मुख्य कार्यकारी अधिकारी देव शंकर त्रिपाठी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. राज्यात पहिल्या वर्षी ११ शाखांचे नियोजन असून, त्यापैकी मुंबईसह नागपूर, कल्याण, औरंगाबाद या शाखा चालू महिन्यांपासून सुरू होतील, तर पुणे, नाशिक, धुळे, अकोला, पनवेल, पालघर या शाखा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरू होतील, असे त्यांनी सांगितले. साधारण ८ ते १० लाख रुपये आणि कमाल २० लाख रुपये किमतीपर्यंतच्या घरासाठी गरजूंना कर्ज वितरणाचे लक्ष्य ठेवून, मार्च २०१६ पर्यंत १०० कोटी रुपयांचे तर मार्च २०१७ पर्यंत ३०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण ‘आधार’कडून राज्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध १३ राज्यांत कार्यरत ‘आधार’ने जुलै २०१५ अखेर १,११५ कोटी रुपयांचे गृहकर्ज वितरण केले आहे.
केंद्राच्या महत्त्वाकांक्षी १०० स्मार्ट शहरांच्या विकसनाच्या योजनेत राज्यातील १० शहरे आहेत. शिवाय २०२२ पर्यंत सर्वासाठी घरे योजना राबवितानाही, प्रामुख्याने आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, असंघटित क्षेत्रातील तसेच अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ९० ते ९५ टक्के घरे उभारली जातील. हे सर्व ‘आधार’चे संभाव्य ग्राहक असतील, असा विश्वास त्रिपाठी यांनी व्यक्त केला. राज्याबाबत कर्ज वितरणाचा पहिल्या वर्षांसाठी निर्धारित १०० कोटींचा आकडा छोटा भासत असला तरी त्याच्या लाभार्थीची संख्या १,२०० ते १,३०० असेल.

उत्पन्नाच्या पुराव्यांविना गृहकर्ज!
बँका व गृहवित्त संस्थांकडून कर्जासाठी अपात्र ठरलेल्या मंडळींना घराच्या खरेदीसाठी, बांधकाम/ नूतनीकरणासाठी कर्ज मिळवून देणारी योजना व प्रक्रिया हेच ‘आधार’चे वैशिष्टय़ राहिले आहे, असे देव शंकर त्रिपाठी यांनी सांगितले. नियमित वेतन नसणाऱ्या म्हणजे स्वयंरोजगार करणारे, फेरीवाले, कारागीर आदींना कंपनीने आधार दिला आहे. उत्पन्नाचा पुरावा म्हणून वापरता येईल असे कर विवरण पत्र दाखल न करणाऱ्या व बँकेत खातेही नसणाऱ्या मंडळींना त्यांच्या कुवतीनुरूप घर शोधून देण्याचे कामही ‘आधार’ करते. अर्थात अशा घरांचे बांधकाम अपुरे त्यामुळे उपलब्धताही खूपच कमी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.