|| शैलजा तिवले

मृत्यू रोखण्यासाठी सुविधांवर भर देण्याची समितीची शिफारस

मुंबई : चाचण्यांतील विलंब, अतिदक्षता विभाग किंवा रुग्णालयात रुग्ण वेळेत दाखल न करणे आणि उपचार नियमावलीचे उल्लंघन यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या वाढल्याचे निरीक्षण मृत्यू विश्लेषण समितीने नोंदवले आहे. खाटा, प्राणवायू, औषधांचा तुडवडा आणि तोकड्या पायाभूत सुविधा आदींमुळेही मृतांच्या संख्येत भर पडल्याचे दिसत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने डॉक्टरांच्या प्रशिक्षणासह पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणे आवश्यक असल्याची शिफारस समितीने केली आहे.

करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्युदर कमी राहिला असला तरी मृतांच्या संख्येत मात्र जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली.

राज्यात मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत ४९,५२१ मृत्यू झाले होते, तर जानेवारी ते २२ मे २०२१ पर्यत  ६९,२७४ मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेमध्ये जिल्हा पातळीवरील आरोग्य व्यवस्था, खाटा, अतिदक्षता खाटा, औषधे, प्राणवायू आदी सुविधांबाबत सक्षम नसल्याचे प्रामुख्याने दिसून आले. तसेच रुग्णालयांमध्ये उपचार नियमावलीचा योग्य वापर झालेला नसल्याचे दिसून आले आहे.

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाही उत्तेजके देण्यात आल्याचे अनेक प्रकार समोर आले. तसेच उत्तेजकांची मात्रा आणि वेळा यांचे प्रमाणही योग्य न ठेवता अतिरेक करण्यात आला. तसेच रुग्णाचा मधुमेह अनियंत्रित असणे, रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आणि अतिदक्षता विभाग आणि प्राणवायू देण्यासाठी वापरलेली साधने यांची स्वच्छता नसणे यामुळे म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले. कृत्रिम श्वासनयंत्रणा आणि अतिदक्षता विभाग यांचे व्यवस्थापन पूर्णपणे योग्य रीतीने केले गेले नाही, अशी काही निरीक्षणे समितीने अहवालात नोंदवली आहेत.

मृत्यू रोखण्यासाठी…

अतिदक्षता विभागात किंवा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर काटेकोर देखरेख ठेवण्यासह अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना सातत्याने प्रशिक्षण देणे, गंभीर प्रकृतीच्या रुग्णांविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. छोटी रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागाचे व्यवस्थापन योग्य रीतीने होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय महाविद्यालये यांना जोडणारी व्यवस्था निर्माण करावी. गंभीर प्रकृतीच्या रुग्णांच्या उपचारामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यास यामुळे मदत होईल, असे उपाय समितीने सुचवले आहेत.

मृतांची माहिती वेळेत

सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांत मृत्यू समिती कार्यरत असल्याची आणि नियमावलीप्रमाणे मृत्यूची नोंद केली जात आहे का याची खात्री करणे, मृत्यू झाल्यापासून ४८ तासांच्या आत मृत्यूची नोंद करण्याच्या सूचना जिल्ह्यांना देण्यात याव्यात, असे समितीने सांगितले आहे.

मृत्यूची कारणे काय?

दुसऱ्या लाटेत बहुतांश मृत्यू हे श्वासनसंस्था निकामी होणे, अन्य संसर्गामुळे झाले. काही रुग्णांचा मृत्यू हा हृदयाच्या स्नायूमध्ये दाह निर्माण होणे (मायोकार्डिटिस) आणि गुठळ्या झाल्याने फुप्फुसाला रक्तप्रवाह न पोहोचल्याने झाला आहे. दुसऱ्या लाटेत बहुतांश रुग्णांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर सात ते आठ दिवसांनी झाला. मृतांमधील ८० ते ९० टक्के रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मनुष्यबळाचे प्रशिक्षण

सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या जबाबदारीनुसार सातत्याने प्रशिक्षण द्यावे. कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह तज्ज्ञ डॉक्टरांनाही प्रशिक्षण द्यावे. रुग्णसेवेसाठी अधिकाधिक मनुष्यबळ तयार करावे. प्राणवायूचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच तज्ज्ञ फिजियोथेरपी डॉक्टरची नेमणूक करावी, असे समितीने सुचविले आहे.म

रुग्णांच्या मदतीसाठी…

गाव पातळीवर गृह विलगीकरणातील प्रत्येक रुग्णाची देखरेख केली जावी. ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, बचत गट यांच्या मदतीने रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची सुविधा निर्माण केली करावी, जिल्हा पातळीवर २४ तास कार्यरत असणारी मदतवाहिनी सुरू करावी, अशा शिफारशी समितीने केल्या आहेत.

पायाभूत सुविधांची उपलब्धता

कृत्रिम श्वासन यंत्रणा, खाटा, अतिदक्षता खाटा आदी सुविधा जिल्हा पातळीवर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करणे. तसेच प्राणवायू आणि औषधांचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रत्येक रुग्णालयाने संभाव्य गरजेनुसार याची मागणी आरोग्य विभागाकडे करावी.