असहिष्णुता, जमावाची हिंसा, महिलांवर होणारे अत्याचार अशा घटना देशाच्या आर्थिक विकासाला नुकसान पोहोचवत असल्याचे मत दिग्गज उद्योगपती आणि गोदरेज समुहाचे अध्यक्ष आदि गोदरेज यांनी व्यक्त केले. सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

एकीकडे केंद्र सरकार भारताला पाच ट्रिलिअन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यावर जोर देत आहे. तर दुसरीकडे जातीय हिंसा, असहिष्णुता यांसारख्या घटनांमधून अर्थव्यवस्थेलाच नुकसान पोहोचत असल्याचे ते म्हणाले. सध्या भारत गरीबीसारख्या समस्येचा मोठा सामना करत आहे. ही स्थितीदेखील विकासाच्या गतीला नुकसान पोहोचवू शकते. तसेच आपल्याला आपल्या क्षमता ओळखण्यापासून रोखू शकते, असेही ते म्हणाले.

देशात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. गेल्या चार दशकांपेक्षा उच्च स्तरावर बेरोजगारी पोहोचली आहे. तर देशातील अनेक मोठी शहरे आज पाण्याच्या संकटाचा सामना करत आहेत. प्लॅस्टिकचा वाढता वापर आणि आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळेही नागरिक त्रस्त असल्याचे ते म्हणाले. असे प्रकार अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे ते म्हणाले. तसेच यांचा सामना करण्यासाठी युद्धस्तरावर काम करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच आपण आर्थिक समस्यांचा सामना करू शकू असे त्यांनी नमूद केले.