व्हिवा लाउंजमध्ये उद्या महिला वैमानिक आदिती परांजपे यांच्याशी संवाद साधण्याची संधी

‘मोठेपणी विमान चालवायचेय..’  मोठेपणी कोण होणार? या प्रश्नचे उत्तर देताना कित्येक लहान मुले हे स्वप्न बोलून दाखवतात. शब्दश: आकाशाला गवसणी घालायचे हे स्वप्न खूप कमी जण खरे करू शकतात. कॅप्टन आदिती परांजपे अशा मोजक्यांपैकी एक. स्त्री वैमानिक म्हणून त्यांची जडणघडण आणि कॉकपिटमधील आव्हानात्मक अनुभवांविषयी त्यांच्याकडूनच जाणून घ्यायची संधी सोमवारी होणाऱ्या व्हिवा लाउंज या कार्यक्रमातून मिळणार आहे.

लोकसत्ता व्हिवा लाउंजच्या मंचावरून विविध क्षेत्रांत धडाडीने काम करणाऱ्या तरुण स्त्रियांशी मुक्त संवाद साधता येतो. त्यांच्या कामातून प्रेरणा घेण्याबरोबरच त्या क्षेत्राची जवळून ओळख करून घेण्याचा उद्देशही या कार्यक्रमाचा असतो. या वेळी व्हिवा लाउंजमध्ये प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रातील कॅप्टन आदिती यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वैमानिक होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, कुठली कौशल्ये लागतात, या क्षेत्रातील नोकरीच्या संधी किती आहेत आणि आव्हाने काय आहेत याबाबत आदिती परांजपे यांच्याशी संवाद साधता येईल. जेट एअरवेअजमध्ये कमांडर असणाऱ्या आदिती, प्रवासी वाहतूक करणारे बोइंग ७३७ विमान सराईतपणे चालवतात. यासंदर्भातील कुठलीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसतानाही, मराठी माध्यमात शिकलेली ही मुलगी वैमानिकबनली हे विशेष. वेगाने विस्तारणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि त्याबाबतचे अनुभव या तरुण कमांडरकडून ऐकता येतील. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळेल.

कधी – सोमवार, १८ एप्रिल

*  कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्कसमोर, दादर (प.)

*  वेळ – सायंकाळी ४.४५ वाजता.