आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेची पर्यावरण मान्यतेअभावी रखडपट्टी

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या वाताहत झालेल्या सांडपाणी वाहिनीवर सज्जा (दर्शनी गॅलरी) उभारून पर्यटकांना समुद्रदर्शन घडविण्याची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना त्यांच्या खात्याच्या परवानगीअभावी रखडली आहे. राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडून या प्रकल्पासाठी सागरी हद्द नियंत्रण कायद्याअंतर्गत (सीआरझेड) परवानगी मिळणे आवश्यक आहे. मात्र, ही परवानगी नसल्याने चौपाटीवरील सज्जा सहा महिने लांबणीवर पडला आहे.

कोणे एकेकाळी दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील धडधडणाऱ्या इंदू मिलमधून समुद्रात मोठय़ा प्रमाणात सांडपाणी सोडण्यात येत होते. मिलपासून किनाऱ्यापर्यंत सांडपाणी सोडण्यासाठी स्वतंत्र वाहिनीची व्यवस्था करण्यात आली होती. इंदू मिल बंद झाल्यानंतर या वाहिनीमधून पावसाचे पाणी समुद्रात जात होते. आता या वाहिनीची वाताहत झाली आहे. आजघडीला या परिसराला अतिशय बकाल रूप आले आहे. ही अवस्था रोखून या ठिकाणी दर्शनी सज्जा उभारण्याची संकल्पना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. महापालिकेनेही त्यानुसार आकर्षक सज्जा उभारण्याची तयारी केली. या कामासाठी पालिकेने निविदा प्रक्रियाही पूर्ण केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

या सज्जासाठी सागरी हद्द नियंत्रण कायद्याअंतर्गत (सीआरझेड) परवानगी मिळावी यासाठी फेब्रुवारीमध्ये पालिकेने पर्यावरण मंत्रालयाला पत्र पाठविले आहे. सुमारे सहा महिने होत आले तरी अद्याप आपल्याच खात्याच्या मंत्र्याने सोडलेल्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी पर्यावरण मंत्रालयाकडून सज्जा प्रकल्पासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी सोडलेल्या संकल्पाची पालिकेला पूर्तता करता आलेली नाही. दरम्यान, या संदर्भात  आदित्य ठाकरे यांना मोबाइलवर, तसेच लघुसंदेश पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मुंबई महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने याबाबत पर्यावरण मंत्रालयाला पत्र पाठविले आहे. करोना संसर्गामुळे परवानगी मिळू शकलेली नाही. लवकरच परवानगी मिळेल आणि काम सुरू होईल.

-विशाखा राऊत, सभागृह नेता