मुंबई : आमचा मेट्रो रेल्वेला विरोध नाही, पण आरेमध्ये कारशेड बांधण्यामुळे तेथील जैवविविधता नष्ट होण्याचा व मुंबईला पुराचा धोका असल्याने पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी मात्र आरेमध्ये कारशेड न झाल्यास मेट्रो-३ अशक्य असल्याची धमकी धमकी देत आहेत, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर टीकास्त्र सोडले.  महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना जमत नसेल तर सरकारने दुसरा सक्षम अधिकारी नेमावा, अशी मागणीही आदित्य यांनी अश्विनी भिडे यांचा नामोल्लेख न करता केली.

‘आरे’मधील कारशेडच्या विरोधातील आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आरेमधील मेट्रोच्या कारशेडला विरोध करण्यासाठी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात  वन्यजीव अभ्यासक नयन खानोलकर आणि राजेश सानप यांनी या वेळी आरेमधील जैवविविधतेचे दर्शन घडवणारे सादरीकरण केले. आरेमधील कारशेडच्या जागेजवळ बिबटे, दुर्मीळ रानमांजरासह विविध प्राण्यांचा वावर असतो.  त्याचबरोबर पावसाळ्यात मिठी नदीला पूर येऊन आंतरराष्ट्रीय विमानतळासह आसपासचा परिसर पाण्याखाली जाईल, असे मत तज्ज्ञांनी प्रकल्पाबाबत दिले होते.मुंबई महानगरपालिकेच्या समितीनेही आरेऐवजी कांजूरमार्गची जागा सुचवली होती, याकडे खानोलकर व सानप यांनी लक्ष वेधले. कारशेडसाठी इतर जागांचा पर्याय असताना ‘आरेच का रे’, असा सवाल ठाकरे यांनी केला. राजकीय हेतूने नाही तर मुंबईकर म्हणून आरे कारशेडला विरोध करत आहोत असे स्पष्ट केले.