आदित्य ठाकरे म्हणजे नवा पप्पू अशी टीका आपच्या प्रीती मेनन यांनी केली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरुन एक ट्विट करत त्यांनी आरेच्या मोहिमेवरुन आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “आदित्य ठाकरे म्हणजे नवा पप्पू आहेत. त्यांच्या आरे बचाव मोहिमेबाबत वापरलेल्या शब्दांचा आणि कृतीचा परस्पर संबंध नाही” असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच #PappuThackery हा हॅशटॅगही ट्रेन्ड केला आहे. @terence_fdes या अकाऊंटवरुन आरे बचाव संदर्भातलं ट्विट करण्यात आलं आहे. ते रिट्विट करताना त्याला दिलेल्या उत्तरात आपच्या प्रीती मेनन यांनी आदित्य ठाकरेंना पप्पू ठाकरे असं संबोधलं आहे.

पप्पू हे संबोधन भाजपा नेत्यांनी कायमच राहुल गांधी यांच्याबाबत वापरलं आहे. आता मात्र आपच्या प्रीती मेनन यांनी राहुल गांधी यांना नाही तर आदित्य ठाकरेंना पप्पू असं म्हटलं आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख प्रीती मेनन यांनी पप्पू ठाकरे असाही केला आहे.  “शिवसेनेचा मेट्रोला विरोध नाही, तर आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे” असे आदित्य ठाकरे यांनी १० सप्टेंबरला म्हटलं होतं.  “या मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड करण्यात येणार आहे आणि ते शिवसेनेला मान्य नाही” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.

१० सप्टेंबरला मुंबईत आदित्य ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत काही तज्ज्ञही उपस्थित होते. चित्रफित सादर करुन त्यांनी आरेचे महत्त्व पटवून दिले.  मात्र आता आदित्य ठाकरे यांनी आरेबाबत मांडलेली भूमिका आणि कृती यामध्ये फरक आहे त्याचा परस्परसंबंध नाही असे म्हणत प्रीती मेनन यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच त्यांना पप्पू असेही संबोधले आहे. आता प्रीतीन मेनन यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेकडून काही प्रत्युत्तर दिलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.