मुंबईमध्ये नाइट लाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली. “नाइट लाइफ म्हणजे पब आणि बारच नसेल. पब आणि बार रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहिल. ज्यांनी जीआर वाचला नाही, त्यामुळे तेच असं बोलत आहेत, अशी टीका करतानाच या निर्णयामुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही,” असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत २७ जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली. पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट लाईफ म्हणजे केवळ पब आणि बार इतकंच नसेल. बार आणि पबसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, इतर हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकानं सुरू ठेवणे बंधनकारक नाही. हे प्रत्येकावर अवलंबून असेल,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई पोलिसांवर ताण येणार नाही –

नाईट लाईफमुळे पोलिसांवर ताण येणार असल्याच राजकीय नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. आता पोलिसांना गस्तीच काम असतं. पण, नाइट लाइफमुळे पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही. कारण दुकान मालकांना स्वतःची सुरक्षा घेण्याचा सांगण्यात आलं आहे. त्यात मोबदला देऊन ते पोलिसांची सुरक्षा घेऊ शकतात. यामुळे पोलीस विभागाच्या उत्पन्नात भर पडेल. पब आणि बार रात्रभर चालतील असं जे नेते म्हणत आहेत, त्यांनी कदाचित जीआरच वाचलेला नाही. त्यांनी जीआर वाचावा,” असं उत्तर ठाकरे यांनी नाइट लाइफच्या निर्णयावर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना दिलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray talked about nightlife in mumbai bmh
First published on: 22-01-2020 at 14:07 IST